मी जिवंत आहे..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेथे लावलेल्या मृतांच्या छायाचित्रांच्या फलकावर एका जिवंत व्यक्तीचेही छायाचित्र लावण्याचा प्रकार अतिउत्साही स्थानिक राजकीय नेत्यांनी केला. त्यामुळे गोवंडीतील इम्रान जान मोहम्मद शेख (वय 34) यांच्यावर "मी जिवंत आहे', असे सांगण्याची वेळ आली आहे.

चेंगराचेंगरीत इम्रान शेख यांचे मामा मसूर आलम यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांचे कुटुंबीय केईएम रुग्णालयात आले होते. तेथे काही पत्रकारांनी शेख यांच्याकडे त्यांच्या मामाचे छायाचित्र मागितले. शेख यांच्या मोबाईलमध्ये ते आणि त्यांचे मामा एकत्र असलेले जुने छायाचित्र होते. ते त्यांनी पत्रकारांना दिले आणि त्यातील मामाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यास सांगितले. शेख यांनी दिलेले छायाचित्र स्थानिक राजकीय नेत्यांच्या हाती लागले आणि त्यांनी मामा-भाच्यांना श्रद्धांजली वाहिली. फलकावर लावलेल्या मृतांच्या छायाचित्रांत शेख यांचेही छायाचित्र झळकले. शेख यांच्या छायाचित्राखाली "आलम ऍण्ड हिज फ्रेंड' असेही लिहून टाकले.

'वृत्तवाहिन्यांवर दाखवलेल्या फलकावर माझे छायाचित्र पाहिल्यानंतर आमच्या नातेवाइकांनी, मित्रांनी आणि परिचितांनी फोन केले. माझी चौकशी केली. काही नातेवाईक माझ्या घरीही आले. मी जिवंत आहे, असे सांगण्याची वेळ माझ्यावर आली आहे,'' अशा शब्दांत शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इम्रान आणि त्यांचे मामा मसूर आलम दोघेही दादरला काम करतात. दुर्घटनेच्या दिवशी शेख यांनी जलद लोकल पकडल्यामुळे ते दादर स्थानकात उतरले होते. तेथून ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यांच्या मामाने धीमी लोकल पकडली. त्यामुळे ते एल्फिन्स्टन स्थानकावर उतरले आणि पुलावरून उतरत असताना चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: mumbai news elphinstone station stampede many dead injured

टॅग्स