दारिद्य्ररेषेवरील ग्राहकांना मोफत वीजजोडणी

सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

मुंबई - राज्यातील दारिद्य्ररेषेच्या वरील (एपीएल) वीजग्राहकांनाही मोफत वीजजोडणी मिळणार आहे. राज्यात शहरी भागातील २७ हजार ग्राहकांना याचा फायदा घेता येईल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘सौभाग्य’ योजनेंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. आतापर्यंत केवळ दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) ग्राहकांनाच मोफत वीजजोडणी मिळत होती. ऊर्जा विभागाच्या आकडेवारीनुसार शहरी भागातील २७ हजार ९२ कुटुंबे विजेपासून दूर आहेत.

सौभाग्य योजनेतील सुधारणांनुसार आता एपीएल वीजग्राहकांनाही घरापर्यंत वीज पुरवण्यात येणार आहे. घराअंतर्गतची वीजवाहिन्यांची व्यवस्थाही मोफत करून देण्यात येणार आहे. ‘सामाजिक-आर्थिक जात जनगणना २०११’ मध्ये ज्या शहरी भागातील ग्राहकांची नावे आहेत, अशा ग्राहकांना मोफत वीजजोडणी देण्यात येणार आहे. तर या जनगणेत नाव नसणाऱ्या ग्राहकांनाही ५०० रुपयांत सौभाग्य योजनेचा लाभ घेता येईल. महिन्याला ५० रुपये याप्रमाणे समान १० हप्त्यांत या रकमेची वसुली केली जाईल. 

केंद्राच्या सौभाग्य योजनेंतर्गत सुरुवातीला फक्त बीपीएल ग्राहकांना मोफत वीजजोडणी देण्यात येत होती; पण अनेक राज्यांनी केंद्राला सूचना केल्यानंतर एपीएल ग्राहकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. 

ग्रामविकास विभागावर भिस्त 
विजेपासून दूर राहिलेल्या ग्राहकांची महाराष्ट्रातील वेगवेगळी आकडेवारी वेळोवेळी उघडकीस आली आहे. त्यामुळेच नेमक्‍या आणि अचूक आकडेवारीसाठी महावितरण आणि ग्रामविकास विभागाची नुकतीच बैठक झाली. नोव्हेंबरअखेरीस संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील विजेपासून दूर राहिलेल्या कुटुंबांची आकडेवारी महावितरणला सादर करण्यात येणार आहे. महावितरणने केंद्रीय ऊर्जा विभागाला सादर केलेल्या आकडेवारीनुसार ९८ टक्के महाराष्ट्रात वीज पोहोचली आहे; तर ग्रामीण भागातील ३ लाख ४३ हजार ६०० ग्राहक अजूनही अंधारात आहेत. गडचिरोली आणि नंदूरबार येथे अंधारात असणाऱ्या गावांच्या माहितीत जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव संख्या मांडली आहे. गडचिरोलीत नव्याने पाड्यांपासून गावात रूपांतर झालेल्या ग्राहकांची संख्याही त्यात आहे. नंदूरबारमध्ये पुनर्वसनामुळे स्थलांतर झालेली कुटुंबेही विजेपासून दूर आहेत.

Web Title: mumbai news Free electricity connection APL