गणेशोत्सव कौटुंबिक असावा - पोलिस आयुक्त नगराळे

गणेशोत्सव कौटुंबिक असावा - पोलिस आयुक्त नगराळे

बेलापूर - घरगुती गणपतीला कुटुंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित असतात. मात्र सार्वजनिक गणेशोत्सवाला १५ ते २५ वयोगटातील मुले आणि तरुण यांचाच पुढाकार असतो. असे का होते, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना फक्त काही विशिष्ट तरुणांनीच तो साजरा न करता सर्व कुटुंबीयांसोबत साजरा केला पाहिजे. त्यात लहान मुले, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा सहभाग असला पाहिजे, असे मत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केले.

नेरूळमधील आगरी-कोळी भवन येथे २०१६ च्या स्पर्धेतील गणेशोत्सव मंडळांचा बक्षीस वितरण कार्यक्रम गुरुवारी आयोजित केला होता. त्यात त्यांनी मंडळांना मार्गदर्शन केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत डीजे, डॉल्बी, बीभत्स नाच, चित्रपटांची गाणी सुरू असतात. मग अशा कार्यक्रमात घरातील महिला येतील का? असे करणे योग्य आहे का? याचा विचार मंडळांनी केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवात शाळा-कॉलेजमधील तरुण-तरुणींसाठी करियर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेतील संधी, व्यवसाय, रोजगार याविषयीची मार्गदर्शन शिबिरे असे उपक्रम राबवले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिला. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये पोलिसांनाही सामावून घ्या, असे सांगून या वेळीही गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यास मदत व सहकार्य करा, असे आवाहन आयुक्तांनी मंडळांना केले. 

परिमंडळ- १ मधील १० ठाण्यांतर्गत ६० गणेशोत्सव मंडळांना उत्कृष्ट मूर्ती, देखावा, सजावट, शिस्तबद्ध मंडळ, विधायक उपक्रम याविषयी बक्षीस देऊन गौरवण्यात आले. विसर्जनातील स्वयंसेवक आणि खाडी पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व घसरून पडलेल्या शेकडो जणांचे प्राण वाचवणारे वाशीतील दत्तात्रय भोईर, महेश सुतार यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. सहायक आयुक्त प्रशांत बुरुडे, उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे, वाहतूक पोलिस उपायुक्त नितीन पवार आदी या वेळी उपस्थित होते.

डीजे, डॉल्बीवर कारवाई 
७० डेसिबल ही आवाजाची मर्यादा पाळण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. तेव्हा याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी मंडळांना दिला. ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरणारे डीजे, डॉल्बी, जनरेटर जप्त केले जातील, असे त्यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी व्हॉट्‌सॲप ग्रुप 
पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना काही सूचना करायच्या असतील किंवा गणेशोत्सव मंडळातील सदस्यांना तातडीने काही मेसेज द्यायचा असेल, एखाद्या अनुचित प्रकाराबाबत, संशयास्पद प्रकाराची माहिती द्यायची असेल, तर त्यासाठी व्हॉट्‌सॲप ग्रुप बनवून माहिती आदान-प्रदान करावी. त्यामुळे एकमेकांच्या समस्या समजण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळ व पोलिस यांचे व्हॉट्‌सॅप ग्रुप बनवा, अशी सूचना आयुक्तांनी वरिष्ठ निरीक्षकांना केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com