गंगाखेड साखर कारखान्यात 650 कोटींपेक्षा अधिकचा गैरव्यवहार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जुलै 2017

गुट्टे यांची सीबीआय, "ईडी'मार्फत चौकशीची धनंजय मुंडे यांची मागणी

गुट्टे यांची सीबीआय, "ईडी'मार्फत चौकशीची धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबई - रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड (जि. परभणी) येथील गंगाखेड शुगर्स कारखान्याने शेतकऱ्यांची बॅंकांच्या मदतीने फसवणूक करून 650 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत याची सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि "सीबीआय'मार्फत चौकशी करण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे बोलत होते.

गुट्टे व संचालकांनी बनावट कागदपत्रे व बॅंक अधिकाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर काढलेले कर्ज हा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणी करणार असल्याचे मुंडे म्हणाले.

कुलगुरू डॉ. देशमुख यांना पदावरून दूर करा
मुंबई विद्यापीठ परीक्षा प्रक्रियेत उडालेला गोंधळ तसेच परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्याने झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्यपालांना आदेश द्यावे लागल्याची घटना ताजी असताना विद्यापीठाने 111 कोटींच्या ठेवी मुदतपूर्व काढल्याची माहिती समोर आली आहे. यातून विद्यापीठाचा बेजबाबदार, नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, याची जबाबदारी सर्वस्वी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची असल्याने राज्यपालांनी त्यांना तत्काळ पदावरून दूर करावे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या वेळी केली.

झोपडपट्टी सुधार प्राधिकरणाचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सेवेच्या शेवटच्या पाच दिवसांत 450 नस्त्या मंजूर केल्याचे प्रकरण संशयास्पद आहे. यात आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी शेवटच्या महिन्यात मंजुरी दिलेल्या सर्व प्रकरणांना स्थगीती द्यावी, या कालावधीतील त्यांच्या दूरध्वनी, आवकजावकच्या नोंदी, टपालवही ताब्यात घ्यावी, त्यांच्या कारकिर्दीतील सर्व व्यवहारांची विशेष तपास पथकाकडून चौकशी करावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली.