फेरीवाल्यांना घरगुती गॅस न देण्याचे वितरकांना आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मुंबई - रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते घरगुती गॅस सिलिंडर वापरत असल्याबाबतची नोटीस महापालिकेने पाठवल्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियमने वितरकांना याबाबत निर्देश दिले आहेत.

मुंबई - रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते घरगुती गॅस सिलिंडर वापरत असल्याबाबतची नोटीस महापालिकेने पाठवल्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियमने वितरकांना याबाबत निर्देश दिले आहेत.

महापालिकेने दोन वर्षांपासून फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. मात्र, पालिकेची पाठ फिरल्यावर खाद्यपदार्थ विक्रेते पुन्हा रस्त्यावर येतात. घरगुती वापराचे सिलिंडर त्यांच्याकडून जप्त केल्यानंतरही पुन्हा त्यांच्याकडे असे सिलिंडर आढळतात. हा प्रकार लक्षात येताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी थेट गॅस वितरक कंपन्यांवरच कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. तशी नोटीसही भारत अणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना पाठवण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनने तशा सूचना वितरकांना दिल्या आहेत.

२२ फेरीवाल्यांवर गुन्हे  
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावर अन्न शिजवता येत नाही. मात्र, मुंबईत ते सर्रास शिजवले जाते. अशा १२४ फेरीवाल्यांविषयी पालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यातील २२ फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालिका आतापर्यंत फेरीवाल्यांकडून दंड वसूल करून त्यांचे साहित्य परत देत होती. त्यानंतर त्यांचे स्टॉल तोडून टाकण्यास सुरुवात झाली. आता थेट फेरीवाल्यांवर पोलिस कारवाई सुरू झाली आहे.