माटुंग्यात गोलू उत्सवाची धूम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सायन - गणेशोत्सवानंतर शहरात नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. नवरात्री उत्सव दक्षिण भारतात ‘गोलू’ या नावाने ओळखला जातो. दक्षिण भारतातील नागरिकांची मोठी वस्ती असलेल्या माटुंग्यामध्ये ‘गोलू’ उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माटुंग्यातील बाजारपेठा गोलूसाठी सज्ज झाल्या आहेत. 

तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातील नागरिक माटुंग्यात मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे या भागात नवरात्रोत्सव काळात गोलू सणाची धूम असते. हे नागरिक पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करतात. दक्षिण भारतीय गोलू उत्सवात घटस्थापना करण्याबरोबरच एका स्टॅंडवर एकावर एक देवींच्या मूर्ती उभारतात. यात रामायण, महाभारत, कृष्ण, गणपती इत्यादी देवतांच्या मूर्तीही असतात. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे दर्शन करणारे देखावेही यानिमित्ताने उभारण्यात येतात.

गोलू या उत्सवासाठी लागणाऱ्या आकर्षक मूर्ती व साहित्य खरेदीसाठी माटुंगा फूल मार्केटमधील गिरी स्टोरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पूजेसाठी लागणाऱ्या देवींच्या मूर्ती ५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. यामध्ये दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या मूर्तींसह ‘मरप्पा’ या लाकडी जोडप्याची मूर्ती ही पूजेसाठी महत्त्वाची असते. या सर्व मूर्ती चेन्नईतून आणल्या जातात. गणेशोत्सवानंतर ते नवरात्रोत्सव संपेपर्यंत या मूर्तींची खरेदी दक्षिण भारतीय नागरिकांकडून करण्यात येते, असे गिरी स्टोरच्या मालक रेखा काशी विश्‍वनाथ यांनी सांगितले.