सिने कामगारांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

सिने कामगारांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

गोरेगाव - वेतनापासून कामाच्या वेळांबाबत विविध मागण्यांसाठी सिने कामगार संघटनांनी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. संपाचा परिणाम विशेषतः मुंबईबाहेरील आणि मुंबईतील खासगी स्टुडिओमध्ये काही प्रमाणात दिसून येत असला तरी त्याचे केंद्रस्थान असलेल्या गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये अर्थात फिल्मसिटीत विशेष फरक पडलेला नाही. बहुतांश ठिकाणी चित्रीकरण सुरू असून, चित्रनगरी व्यवस्थापनानेही त्यास दुजोरा दिला आहे.

दरम्यान,  फिल्मसिटीतील मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बुधवारी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. सकाळी जवळपास दीड-दोन हजारांच्या आसपास कामगारांची संख्या होती. त्यांनी घोषणाबाजी केली अन्‌ रस्ता रोखून धरला. संपकऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. फिल्मसिटीमध्ये मात्र बहुतांश मालिकांचे चित्रीकरण नेहमीप्रमाणे सुरू होते. अनुपस्थित कामगारांची संख्या कमी होती; मात्र चित्रीकरणावर कुठलाही परिणाम जाणवला नाही.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध २२ कामगार संघटना संपात सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. टीव्ही व सिनेमात काम करणारे संकलक, दिग्दर्शक, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, स्पॉट बॉय, डमी आर्टिस्ट आदींचा संघटनेत समावेश आहे. आठ तासांची ड्युटी, त्यानंतरच्या अतिरिक्त प्रत्येक तासाला दुप्पट वेतन, ठराविक काळाने वेतनवाढ, कोणत्याही कराराविना कामगारांना कामावर रुजू करून घेऊ नये, नोकरीची हमी, योग्य आहार, सरकारद्वारा ठरवून दिलेल्या सुखसुविधा पुरवाव्यात आदी संपकऱ्यांच्या मागण्या आहेत.

फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि महासचिव दिलीप पिठवा यांनी संपामुळे किमान ४० मालिका आणि दहा ते बारा चित्रपटांचे चित्रीकरण बंद पडल्याचा दावा केला आहे. हिंदीबरोबरच मराठी आणि भोजपुरी चित्रपटांच्या चित्रीकरणावरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. आरे दुग्ध वसाहत, फिल्मिस्तान, मढ, नायगाव, गुजरात सीमा आदी ठिकाणचे चित्रीकरण बंद असल्याचा दावा संप संयोजक करीत आहेत. काही रेकॉर्डिंग स्टुडिओतील कामही ठप्प असल्याचे सांगितले जात आहे.

संतप्त कामगारांनी घोषणा दिल्या आणि मागण्या मान्य न झाल्यास संप तीव्र करण्याचा इशारा दिला. काही चित्रपट निर्माते संपकऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काही कामगारांनी केला.

अनुचित प्रकार नाही
फिल्मसिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रताप आजगेकर यांनी सांगितले, की आम्हाला संपाची पूर्वकल्पना होती. आम्ही पोलिसांनाही कळविले होते. कामगार संघटना आणि निर्मार्त्यांमध्ये काही मुद्द्यांवरून समस्या आहेत; मात्र सरकारी जागा असल्याने साहजिकच आम्ही काळजी घेतली. फिल्मसिटीमध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व चित्रीकरण व्यवस्थित सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com