मुंबईत पावसाचे चार बळी; आजही मुसळधारेची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील नागरिकांना खेळवले. 24 तासांत पडलेल्या पावसाने मुंबई परिसरात चार बळी घेतले. 

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील नागरिकांना खेळवले. 24 तासांत पडलेल्या पावसाने मुंबई परिसरात चार बळी घेतले. 

पावसाचा जोर कालच्या तुलनेत कमी होता; मात्र 29 ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या हालाचा ताजा अनुभव; तसेच हवामान खात्याने मुसळधारेबाबत दिलेल्या इशाऱ्यामुळे धास्तावलेले नागरिक आज घराबाहेर पडलेच नाहीत. त्यामुळे मुंबईतील अनेक बॅंका, सरकारी-खासगी कार्यालये जणू काही ओस पडल्याचे चित्र होते. बस, लोकलमध्येही गर्दी नव्हती. प्रमुख रस्तेही सुनेसुने होते. दिवसभर कधी मुसळधार तर कधी रिमझिम सरी पडत होत्या; मात्र सखल भागात मंगळवारी रात्रीपर्यंत तुंबलेले पाणी काही ठिकाणी सकाळीही ओसरले नव्हते. त्यात बुधवारच्या पावसाची भर पडल्याने प्रमुख भागांतील रस्ते जलमय झाले होते. पावसाचा तडाखा बसलेली लोकलसेवेची गतीही दिवसभर मंदावलेलीच होती. कमी दृश्‍यमानतेमुळे विमान वाहतुकीवरही परिणाम झाला होता. 

पावसाची इनिंग गुरुवारीही (ता.21) सुरूच असेल. उत्तर-दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पाऊस पडेल, असे भाकित हवामान खात्याने वर्तवले आहे. कालच्या जोरदार पावसानंतर मुंबईत वादळ येणार असल्याची अफवा आज दिवसभर सोशल मीडियावर पसरली होती. या अफवेवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी केले. 

दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस 
मुंबईत मंगळवारी पडलेल्या पावसाची 10 वर्षांत सप्टेंबर महिन्यात पडलेला सर्वाधिक पाऊस (303.7 मिमी) अशी नोंद झाली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. 

पावसाचे चार बळी 
मुंबई परिसरात 24 तासांत पडलेल्या पावसाने चार बळी घेतले. वादळी वाऱ्यामुळे छातीला बांधलेला थर्माकोल निसटल्याने अर्जुन चव्हाण हा 13 वर्षांचा मुलगा जुळ्या भावासमोरच बुडाल्याची घटना मंगळवारी कफ परेड येथील समुद्रात घडली. पालघर जिल्ह्यातील मेंढवण घाट परिसरात नाल्यात मोटार पडून एक महिला मृत्युमुखी पडली. मीरा रोड येथे गटारात पडून संजय कांगणे (25) याचा, तर टेंभी-माहीम येथे एका मच्छिमाराचा मृत्यू झाला. भांडूप येथे खिंडीपाड्यामध्ये आठ घरांवर दरड कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्या.

Web Title: mumbai news heavy rain