पनवेल-सावंतवाडीदरम्यान अवजड वाहनांवर बंदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पनवेल ते सावंतवाडीदरम्यान 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बंध लागू नसतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत यासंदर्भातील निवेदन पटलावर ठेवल्यानंतर दिली.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून ट्रक, मल्टिएक्‍सल, ट्रेलर इत्यादी 16 टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) दरम्यान 23 ऑगस्टपासून मर्यादित कालावधीसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल ते सिंधुदुर्गदरम्यान पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गावर ही बंदी असेल. 23 ऑगस्टपासून 6 सप्टेंबरपर्यंत या महामार्गावर वाळू व तत्सम गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहील.

जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक सुरूच
दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल, ऑक्‍सिजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे निर्बंध लागू नसतील, असे मंत्री रावते यांनी सांगितले.