विमानतळ प्राधिकरणावर उच्च न्यायालय नाराज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - विमानतळ परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित यंत्रणांची माहिती देण्याचे निर्देश दिले असतानाही प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे नाराजी व्यक्त केली. विमानतळ परिसरातील उंच इमारतींमुळे सुरक्षेला बाधा येत असल्याचे निदर्शनास आणणारी जनहित याचिका वकील यशवंत शेणॉय यांनी दाखल केली आहे. या याचिकेवरून विमानतळ परिसरातील सुरक्षेचा तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले होते; मात्र गुरुवारी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत जुजबी माहिती देण्यात आली. त्यामुळे खंडपीठाने असमाधान व्यक्त केले.