उच्च न्यायालयात नोंदवला व्हॉट्‌सऍप कॉलने जबाब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

हायटेक सुनावणीने कौटुंबिक दावा निकाली

हायटेक सुनावणीने कौटुंबिक दावा निकाली
मुंबई - कौटुंबिक दाव्याच्या एका सुनावणीदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एक प्रकरण निकाली काढले. घरच्यांच्या मर्जीविरोधात लग्न केलेल्या; परंतु पुन्हा आई-वडिलांकडे परतलेल्या मुलीचा जबाब न्यायालयाने व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉलद्वारे नोंदवून दावा निकाली काढला.

पाच वर्षांपूर्वी या मुलीने पालकांच्या इच्छेविरोधात याचिकाकर्ता मधुर सोन आणि नम्रता (नाव बदलले आहे) यांनी लग्न केले होते. ते पुण्यात स्थायिक झाले होते. नम्रताच्या घरच्यांनी तिला जबरदस्तीने परत नागपूरला नेले. यानंतर मधुर याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली. पत्नीला जबरदस्तीने तिच्या आई-वडिलांनी डांबून ठेवले आहे. तिला पुन्हा न्यायालयात हजर करा, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली होती. नम्रता सध्या देशाबाहेर आहे, असा दावा तिच्या आई-वडिलांतर्फे करण्यात आला. याबाबतची शहानिशा करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार काही दिवसांपूर्वी अतिरिक्त सरकारी वकिलांनी तिला व्हॉट्‌सऍपवरून व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवर झालेल्या संवादात नम्रताने स्पष्ट केले, की ती स्वतःहून परदेशात आलेली आहे आणि पुन्हा पतीकडे जायचे नाही.

सरकारी वकिलांनी या कॉलचा अहवाल न्यायालयात सादर केला. तसेच, व्हिडिओ कॉलच्या वेळेस हजर असलेल्या नागपूर पोलिसांनीही न्यायालयात अहवाल दाखल केल्यामुळे खंडपीठाने ही याचिका निकाली काढली. यापूर्वी अन्य एका प्रकरणातही मुंबई उच्च न्यायालयाने व्हॉट्‌सऍपवरून पाठवलेली नोटीस ग्राह्य मानली होती.