उंदरांनी पोखरले १३० कोटी!

उंदरांनी पोखरले १३० कोटी!

कांदिवली - रुग्णांची गैरसोय, खर्चाच्या तुलनेत इमारतीची झालेली दुरवस्था, रुग्णालयावर येणारा अतिरिक्त ताण, डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, वर्गाचा अभाव, काही ठिकाणी भिंतींना गेलेले तडे, खराब झालेले फ्लोअरिंग... अशी कांदिवलीतील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयाची सध्याची अवस्था रुग्णांना धडकी भरवणारी आहे. काही दिवसांपूर्वी उंदरांनी दोन ज्येष्ठ महिला रुग्णांना चावा घेतला आणि शताब्दी रुग्णालय पुन्हा चर्चेत आले. काही वर्षांपूर्वी शताब्दी रुग्णालयाचे तब्बल १३० कोटी खर्चून नूतनीकरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे त्याचे नामकरणही झाले; परंतु फारसा फरक पडला नाही. उंदरांनी पोखरले १३० कोटी, अशीच सध्या रुग्णालयाची स्थिती आहे.

शताब्दी रुग्णालय १९८३ मध्ये सुरू करण्यात आले, तेव्हा त्याची क्षमता १२० रुग्णांची होती. रुग्णालय मोडकळीस आल्याने इमारत पाडून पालिकेने ३०० खाटांच्या नवीन रुग्णालयाचे बांधकाम १ ऑक्‍टोबर २००६  पासून सुरू केले. पहिल्या टप्प्यात ५६ कोटी खर्च आला. दुसऱ्या भागाच्या कामासाठी ७४ कोटी खर्च आला. त्यात वाढही झाली. दुसऱ्या भागाचे कामकाज पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार आणि काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने कांदिवलीसह उपनगरातील रुग्णांना वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध व्हावी म्हणून बांधून तयार असलेल्या उपाहारगृहाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्या १० बाह्यरुग्ण विभाग व त्याला संलग्न इतर विभाग १७ डिसेंबर २०११ पासून सुरू करण्यात आले. त्याचा उद्‌घाटन सोहळा नेत्रदीपक ठरला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. ‘शताब्दी’चे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका सर्वसाधारण रुग्णालय’ असे करण्यात आले. सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. २२ नोव्हेंबर २०१३ मध्ये डायलिसिस केंद्राचा लोकार्पण सोहळा झाला. भाजपचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. २०१३-१४ मध्ये यंत्रे व संयंत्रे खरेदीसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली. उपकरणांच्या खरेदीसाठी दोन कोटी ८० लाखांची तरतूद करण्यात आली. रुग्णालयासाठी आवश्‍यक असलेल्या प्रवर्गाची २७२ पदे निर्माण करण्यात आली. सर्वसाधारण २५० आणि अतिदक्षता विभागात ५० अशा ३०० खाटांनी रुग्णालय सज्ज झाले; परंतु समस्या सुटलेल्या नाही.  आता तर उंदरांनीच रुग्णांचा चावा घेतल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

उंदरांसाठी  खाटेखाली पिंजरे
उंदीर येऊ शकतील असे रुग्णालयातील तब्बल ३५० मार्ग कीटक नियंत्रण विभागाकडून बुजविण्यात आले. आता रुग्णांच्या खाटेखाली पिंजरे लावले आहेत. पहिल्या मजल्यावरील महिला विभागातील खिडक्‍यांना अद्याप जाळ्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे, असे वैद्यकीय अधीक्षक प्रदीप आंग्रे यांनी सांगितले. क्षमतेपलीकडे आम्ही रुग्ण दाखल करून घेतो. त्यांच्यावर उपचार करतो, असेही ते म्हणाले.

रुग्णालयातील समस्या
एमआरआयसाठी महिनाभर थांबावे लागते, उपचारासाठी इतर खासगी रुग्णालयात पाठविण्यात येते,  रुग्णवाहिका उपलब्ध नसतात, कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही आदी समस्या रुग्णालय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com