जखमी अमितला मदतीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीला रविवारी (ता. 29) महिना झाला. या दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्या प्रवाशांना पश्‍चिम रेल्वेने नुकसानभरपाई दिली. मात्र, जखमी झालेला अमित गुरव हा तरुण नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबई - एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीला रविवारी (ता. 29) महिना झाला. या दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्या प्रवाशांना पश्‍चिम रेल्वेने नुकसानभरपाई दिली. मात्र, जखमी झालेला अमित गुरव हा तरुण नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना रेल्वे आणि राज्य सरकारने 10 लाखांची मदत केली. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना रेल्वेने एक लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई दिली. परंतु, या मदतीपासून अमित वंचित आहे.

दिवा येथे राहणारा अमित कार्यालयीन कामासाठी परळ येथील "इंडिया बुल'मध्ये जात होता. चेंगराचेंगरीत सापडल्याने त्याचे दोन्ही पाय सुन्न झाले. त्याला चालताही येत नव्हते. काही प्रवाशांनी त्याला बाहेर काढून जवळच्या पुनमिया रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे त्याचा क्ष-किरण तपासणी अहवाल येण्यास उशीर लागल्याने त्यांनी तेथून डिस्चार्ज घेऊन केईएम रुग्णालय गाठले. तेथे उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले; परंतु त्याचा समावेश जखमींच्या यादीत करण्यात आला नाही.

अमित भावासोबत दिवा येथे राहतो, तेथे काळजी घेणारे कोणी नसल्याने तो उपचारासाठी संगमेश्‍वरला गेला होता. तेथून परतल्यानंतर तो पुन्हा मुंबईत आला. त्याने 19 ऑक्‍टोबरला दादर पोलिस ठाण्यात जबाबही नोंदवला आहे.

दादर पोलिस ठाण्यात माझा जबाब नोंदवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने माझ्याशी आणि कुटुंबीयांशी संपर्क साधलेला नाही. मला नुकसानभरपाईही मिळालेली नाही.
- अमित गुरव, चेंगराचेंगरीतील जखमी