मुंबईचा धोबीघाट पाहून जपानी शिष्टमंडळ हरखले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

चित्तवेधक गोष्टी मुंबईतच - हिरोयुकी त्सुई

चित्तवेधक गोष्टी मुंबईतच - हिरोयुकी त्सुई
मुंबई - मुंबईचा धोबीघाट सर्वांच्याच परिचयाचा. मात्र, जपानमध्येही 80 वर्षांपूर्वी असाच धोबीघाट होता. तो पाहता आला नाही म्हणून मुंबईतील धोबीघाट पाहण्याची इच्छा जपानच्या वाकायामा राज्याच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे महासंचालक हिरोयुकी त्सुई यांनी व्यक्त केली. आज मुसळधार पावसातही त्यांनी धोबीघाट पाहिला आणि जगाच्या पाठीवरील चित्तवेधक गोष्टी मुंबईतच पाहायला मिळतात आणि तुम्ही मुंबईच्या प्रेमात पडता, अशा भावना व्यक्त केल्या.

महालक्ष्मी येथील धोबीघाटाला जपानी शिष्टमंडळाने आज दुपारी भेट दिली. मुंबईसारख्या महानगरामध्ये एवढ्या मोठ्या जागेवर धोबीघाट असल्याने त्याचे आकर्षण असल्यामुळेच मुंबईच्या दौऱ्यात अन्य पर्यटनस्थळांऐवजी धोबीघाटाला भेट देण्याची इच्छा शिष्टमंडळाने व्यक्त केली. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी त्यांची इच्छा त्वरित पूर्ण केली. वाकायामाच्या नियोजन विभागाचे महासंचालक हिरोयुकी त्सुई यांनी आपल्या मोबाईलवर संपूर्ण धोबीघाटाचे चित्रण केले आणि हे काम नक्की कसे चालते, हे जाणून घेण्यासाठी थेट धोबीघाटाचा रस्ता धरला. त्यामुळे त्यांच्या सुरक्षारक्षकांची एकच धावपळ उडाली.

धोबीघाटात नेमके किती क्‍युबिकल्स आहेत, वॉशिंग मशीनच्या जमान्यातही धोबीघाटातले काम कसे चालते, याची माहिती त्सुई यांना देण्यात आली. त्या वेळी ते म्हणाले, ""जपानमध्ये अशा प्रकारचा धोबीघाट 80 वर्षांपूर्वी होता; मात्र तो पाहता आला नाही. त्यामुळेच हा धोबीघाट पाहण्याची उत्सुकता अधिक होती. अशा प्रकारचा एवढ्या मोठ्या जागेत पसरलेला धोबीघाट मी यापूर्वी कधीच पाहिला नाही. भारतातच किंबहुना मुंबईत अशा प्रकारची अनेक आकर्षण आहेत.''

सारे काही गुंतवणुकीसाठी
महाराष्ट्राचे पर्यटन, स्मार्ट सिटी, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आदी क्षेत्रामध्ये जपानने गुंतवणूक करावी, अशी इच्छा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या वेळी व्यक्त केली. जानेवारी 2018 मध्ये जपानच्या वाकायामाचे गव्हर्नर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या वेळी अनेक सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.