गुजरातमध्ये महाराष्ट्रातील 11 भाविकांचा अपघातात मृत्यू

मयुरी चव्हाण काकडे
रविवार, 27 ऑगस्ट 2017

  • देवदर्शनासाठी जाताना आनंदात होते शहा कुटुंबीय 
  • डोंबिवलीतील शहा कुटुंबीयांवर काळाचा घाला 

डोंबिवली : रविवारी पहाटेच्या सुमारास गुजरातमधील बरवाला येथे सिलेंडरने भरलेला ट्रक व जीपची आमनेसामने धडक बसून ड्रायव्हरसह 11 जणांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चालकासह डोंबिवलीतील एकाच कुटुंबातील 11 लोकांचा समावेश आहे. हे सर्व भाविक देवदर्शनासाठी गुजरातला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने या अपघातातून जैनम नावाचा मुलगा बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील टाटा लाईन रोडला निशीगंध बिल्डिंगमध्ये राहणारी किरण कमलेश शहा (49), मुलगी जिनाली (20) मुलगा नेमील (17), रघुवीरनगर परिसरात नीळकंठ पूजा इमारतीत राहणारे शशिकांत शहा (56), त्यांची पत्नी - सोनल उर्फ रीटा (52) व मुलगी - धारा (25) तसेच राजाजी पथावर वीणा बिल्डिंग मध्ये राहणारे हितेश शहा (52), पत्नी - विभा (48), भाचा - नंदीप (22), भारती शहा (रा. सूरत) आणि चालक महंमद रसूल मलिक (50, रा. बडोदा) हे सर्व अपघातात मृत पावले आहेत. अपघाताचे वृत्त डोंबिवलीत पसरताच निशिगंध, वीणा आणि निळकंठ पूजा इमारतीत विचारपूस करण्यासाठी नागरिक येत होते. 

  निशिगंध सोसायटीच्या येथे आपल्या दोन मुलांसह राहणाऱ्या किरण शहा यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे तर शशिकांत शहा यांचा मुलगा जैनम हा अपघातातून बचावला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला सुरत येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती शहा कुटुंबियांचे डोंबिवली येथील निकटवर्तीय अशोकभाई शहा यांनी दिली. 

देवदर्शनासाठी जाताना आनंदात होते शहा कुटुंबीय 
डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी राहाणाऱ्या मात्र एकाच कुटुंबातील असणाऱ्या शहा परिवाराने जैन समाज्याच्या पर्युषण काळ शनिवारी समाप्त झाल्यामुळे गुजरात राज्यातील भावनगर येथे असलेल्या पलिताना मंदिर येथे देव दर्शनासाठी जाण्याची योजना आखली. शनिवारी हे कुटुंब अत्यंत आनंदात होते. मात्र, तूफान ट्रॅक्स जीपने हे कुटुंब अहमदाबाद महामार्गावर असलेल्या धंधुका-बरवाला येथून भावनगरच्या दिशेने जात असताना पहाटेच्या सुमारास जीप आणि इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडर्सने भरलेल्या ट्रकची धडक झाली अन आनंदात असलेल्या शहा कुटुंबियांवर काळाने घाला घातला. याच कुटुंबातील डोंबिवली येथील 80 वर्षाच्या हसुमती शहा यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्या घरीच होत्या. 

अपघाताचे वृत्त सर्वत्र पसरताच जैन समाजावर शोककळा पसरली. जैन समाजाचा पर्युषण काळ समाप्तीनंतर रविवारी डोंबिवलीत रथयात्रा निघाल्या होत्या. मात्र, संध्याकाळी गोडधोड मिठाई जेवणाचा बेत या समाजाने संपुष्टात आणला. हे सर्व जेवण गरिबांना वाटप करण्यात येणार असल्याचे जैन समाजातील लोकांनी सांगितले.