नागरिकांची इच्छाशक्तीच कल्याण डोंबिवलीला करू शकते कचरामुक्त

संजीत वायंगणकर
रविवार, 9 जुलै 2017

“गाव करील ते राव करील काय” या न्यायाने नागरिकांची इच्छाशक्तीच कल्याण डोंबिवलीला कचरामुक्त करू शकते असा विश्वास रमेश  म्हात्रे यांनी व्यक्त केला.

डोंबिवली - आपल्या प्रभागातून "जनजागृती दिंडी" चे आयोजन करुन स्वच्छता राखून आपले आरोग्य चांगले राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे हे समजवून सांगण्यासाठी आगळ्या दिंडीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे  यांनी रविवारी (9) आयोजन केले.

कचरामुक्त प्रभाग ही संकल्पना राबवून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात नागरिकांच्या साथीने ओला कचरा व सुका कचरा वेगळा केला तर त्याची योग्य व शास्त्रीय पध्दतीने पुनर्वापर करण्यासाठी विविध योजना राबाविणे व शून्य डंपिंगग्राऊंडचे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल याकरिता नागरिकांनी जबाबदारीने प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बांद केल्यास  हे शक्य आहे. त्याकरीता “गाव करील ते राव करील काय” या न्यायाने नागरिकांची इच्छाशक्तीच कल्याण डोंबिवलीला कचरामुक्त करू शकते असा विश्वास रमेश  म्हात्रे यांनी व्यक्त केला.

या दिंडीत नगरसेविका गुलाब म्हात्रे, परिवहन सभापती संजय पावशे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेऊन प्लॅस्टिक मुक्ती व स्वच्छतेची शपथ घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका दहा लाख कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करुन राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरूवात करणार.