कल्याण डोंबिवलीत 70 टक्के इमारतींना 'स्ट्रक्चरल ऑडिट'ची गरज!

संजीत वायंगणकर
सोमवार, 31 जुलै 2017

जुन्या इमारती धोकादायक ठरवून जुन्या भाडेकरूंना योग्य न्याय न देता मालक भाडेकरु वादात अनेक इमारती महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या सहाय्याने धोकादायक ठरविल्या जातात व पाडल्या जातात. भाडेकरू बेघर होतात. प्रसंगी उपोषण करुन देखील न्याय मिळत नाही. अशी माहिती बिल्वदल इमारतीतील रहिवाशांतर्फे लढा देणारे संजय मांजरेकर यांनी सांगितले.

डोंबिवली : घाटकोपरमध्ये  चार मजली इमारत कोसळल्यानंतर आता पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात कल्याण-डोंबिवलीतील इमारतींबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीत एकुण 70 टक्के  इमारतींना स्ट्रक्चरल ऑडीटची गरज असल्याचा दावा नामांकित  वास्तुविशारद माधव चिकोडी यांनी केला आहे. त्याचप्रमाणे केवळ इमारतच नव्हे तर कल्याण डोंबिवलीतील चाळी देखील धोकादायक होऊ लागल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील काही इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा बजावून  पालिका प्रशासन आपले हात वर करत असते.  वास्तविक  कल्याण-डोंबिवलीतील अनेक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट अनेक वर्षात अ केलेले नाही असा दावा वास्तुविशारद माधव चिकोडी यांनी केला आहे.याबाबत अधिक माहिती देताना चिकोडी म्हणाले , सहकारी गृहनिर्माण संस्था  नियमानुसार 15 वर्ष पूर्ण झालेल्या इमारतीचे दर तीन वर्षांनी आणि 30 वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींचे दर दोन वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडीट होणे आवश्यक आहे. डोंबिवलीत 1980 ते 2000 या कालावधील लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे इमारतीची संख्याहि वाढली. मात्र एखाद्या इमारतीच्या एक भाग खाली कोसळला म्हणजे ती इमारत धोकादायक होते असे पालिका जाहीर करते. मात्र वास्तविक हे चुकीचे आहे. आपली इमारत `सेफ आहे कि अनसेफ` आहे याची काळजी त्या इमारती राहणाऱ्या रहिवाश्यांनी घेतली पाहिजे. आज इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट होणे गरजेचे झाले आहे. मात्र एखाद्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले असले तरी त्या ऑडीटच्या अहवालानुसार त्या इमारतीची दुरुस्ती झाली आहे कि नाही हे पाहणे पालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी पालिकेने स्वतंत्र विभाग सुरु केला पाहिजे.

पागडीच्या ईमारती तसेच चाळीही  होऊ शकतात धोकादायक...
चाळीचे बांधकाम करताना फक्त चार भिंतींचा विचार केला जातो. परंतु चाळ बांधकाम करत असताना पाया मजबूत आहे का ते पाहणे आवश्यक  आहे. जर पाय मजबूत नसेल तर त्या भिंती कधीही कोसळू असतात आणि चाळीतील रहिवाश्यांना धोका निर्माण होऊ शकतो अशी वास्तविकता वास्तुविशारद माधव चिकोडी यांनी मांडली.