केडीएमटी सेवा गतिमान व किफायतशीर बनवा- आयुक्तांच्या सूचना

सुचिता करमरकर
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे याच्याकडून परिवहन सेवेची माहिती घेताना आयुक्त वेलारसू यांनी त्यांना अनेक सुचना दिल्या.

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील प्रशासन गतीमान व्हावे तसेच पालिकेच्या परिवहन सेवेच्या उत्पन्नात भर पडावी यादृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे अशा सुचना पालिका आयुक्त पी वेलारसू यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. 

सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील साफ सफाई तसेच विसर्जन व्यवस्थेबाबतचा आयुक्त वेलारसू यांनी आढावा घेतला. विसर्जन स्थळांवरील स्वच्छता तसेच तिथे उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांच्या नियोजनाची त्यांनी माहिती घेतली. या काळात विसर्जन घाटांबरोबरच शहरांतर्गत स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याबाबत त्यांनी संबंधितांना आदेशित केले. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. जास्तीतजास,त नागरिकांनी याचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी या तलावांचा वापर तरुन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याच्या सूचना वेलारसू यांनी केल्या. 

परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे याच्याकडून परिवहन सेवेची माहिती घेताना आयुक्त वेलारसू यांनी त्यांना अनेक सुचना दिल्या. प्रवासी सेवेचा दर्जा सुधारुन प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी नियोजन करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात आले. अस्तित्वातील मार्गांपैकी प्रवासी संख्या अधिक असलेल्या मार्गांवर अधिक लक्ष देत तेथील सेवा तत्पर असेल अशा दिशेने हे नियोजन असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गरजेनुसार चालक वाहक संख्येत भर घालत उत्पन्न वाढीचे प्रयत्न परिवहन विभागाने करावे असेही आयुक्तांनी सांगितले. या मुद्द्यांवर भर देत नियोजन केल्यास परिवहन सक्षम बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नागरिकांच्या तक्रारीला प्राधान्य देत त्यांचे जलदगतीने निवारण करण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्वांना केल्या आहेत. ई गर्व्‍हनन्‍स विभागाचे कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी आयुक्तांनी येथील रिक्त पदे भरण्याच्या सुचना केल्या आहेत. सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम अॅनेलिस्ट ही पदे तातडीने भरण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत.