आयुक्त भाजपचीच कामे करतात : शिवसेनेचा कार्यालयावर हल्लाबोल !

मयुरी चव्हाण काकडे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

शिवसेना नगरसेवकांच्या फाईल्स बाजूला ठेवल्या जातात. आयुक्तांकडून सेना आणि भाजप असा भेदभाव केला जातो असा हल्लाबोलही यावेळी करण्यात आला.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांची कामे करतात आणि सेनेच्या नगरसेवकांच्या फायली दाबून ठेवतात असा आरोप करत मंगळवारी सकाळी संतप्त शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी नगरसेवकांनी आयुक्तांची खुर्ची भिरकावून देत त्यांनी पदभार सोडून परत जावे अशी मागणी केली. तर महिला नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर "आयुक्त हटाव, पालिका बचाव" अशी घोषणा देत ठिय्या मांडला.   

नगरसेवकाचा पदभार स्वीकारून दोन वर्षे सरत आली तरीही पाणी, रस्ते आणि कच-याचा प्रश्न जैसे थेच असून आम्ही ते सोडवू शकलो नाही. याबाबत महापालिकेच्या अधिका-यांना विचारणा केली जाते तेव्हा कायम अधिकारी उडवाउडावीची उत्तरे देतात असा आरोप या महिला नगरसेविकांनी केला. तसेच भाजपाच्या नगरसेवकांच्या कामांबाबत महापालिका आयुक्त तत्परता दाखवितात. मात्र, शिवसेना नगरसेवकांच्या फाईल्स बाजूला ठेवल्या जातात. आयुक्तांकडून सेना आणि भाजप असा भेदभाव केला जातो असा हल्लाबोलही यावेळी करण्यात आला. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

एकीकडे शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने आधीच सेनेची नाचक्की झाली आहे. त्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेलाच विकास कामांसाठी तसेच नागरी प्रश्न सोडविण्यासाठी अशाप्रकारे आंदोलन करावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :