अखेर चक्कीनाका ते नेवाळी रस्त्याची दुरुस्ती सुरू, मात्र पावसाने घातला खो...

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

रस्त्याचे काम सुरू असून पावसाने पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहे, पावसामुळे अडचणी येत आहे, तरीही काम सुरू असून दिवाळी पूर्वी वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्याचा प्रयन्त करू अशी माहिती पालिका उपअभियंता प्रशांत भुजबळ यांनी दिली.

कल्याण : कल्याण पूर्वमधील चक्कीनाका ते नेवाळी रस्ता खराब झाला असून तो दुरुस्त न झाल्यास उपोषण करेन, असा इशारा कल्याण पूर्व मधील आमदार गणपत गायकवाड यांनी देताच त्या रस्त्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे अखेर मुहूर्त मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघासहित  27 गावामधील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात चक्कीनाका ते नेवाळी नाका या हाजीमलंग रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने नागरिकांना सहित वाहन चालकांना चांगलाच त्रास होत आहे.
या रस्त्याची निविदा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने 8 डिसेंबर 2016 रोजी काढली होती, तब्बल 9 महिने झाले कामाला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी वेलरासु सहित त्यांच्या अधिकारी वर्गाला पत्र पाठवून ही अधिकारी कानाडोळा केल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली असून अनेकाना आपला जीव गमवावा लागला, या घटनेमुळे नागरिकामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला असून नागरीक उद्रेक करू शकतात अशी भीती व्यक्त करत वारंवार पत्रव्यवहार करून ही पालिका आयुक्त पी वेलरासु आणि त्यांचे अधिकारी काहीच काम करत नसल्याच्या निषेर्धात उपोषण करण्याचा इशारा आमदार गायकवाड यांनी घेतला होता, याचा धसका घेत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने काम सुरू केल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक दिवस रखडलेल्या रस्त्याचे काम उपोषणचा इशाऱ्याने का होईना पालिकेने काम सुरू केल्याने कामाला मुहूर्त मिळाल्याची चर्चा फार रंगली आहे.

पावसाळ्यामुळे अडथळा
आमदार गणपत गायकवाड यांच्या उपोषण इशारा आणि पत्राची दखल घेत पालिकेने काम सुरू केले मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारंवार रस्त्यात खड्डे पडत आहेत, दिवाळी पर्यंत खडीकरणाचे काम करून सदर रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात येईल तश्या संबधीत ठेकेदारास सूचना दिले असून आपण उपोषण करू नये असे पत्र पालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी आमदार गणपत गायकवाड यांना दिल्याने तूर्त आंदोलन स्थगित झाल्याचे समजते.

मी आमदार आहेच मात्र कल्याण पूर्वमधील एक नागरिक आहे, सर्व सामान्य नागरिकांना ज्या समस्या येतात त्या मला ही येतात म्हणून अनेक विकास कामाचा पाठपुरावा करत आहे आणि शेवट पर्यंत करत राहणार असून मला श्रेय घेण्याची गरज नसून नागरिकांना माहीत आहे कोण काम करते आणि राजकारण अशी खरपूस टीका आणि प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली.

 

Web Title: mumbai news kalyan east chakki naka newali road