कामोठेत राहण्याचे सुख मोठे

कामोठेत राहण्याचे सुख मोठे

नवी मुंबई - मुंबई-पुणे महामार्गालगत वसलेला कामोठे नोड झपाट्याने विकसित झाल्याने अल्पावधीतच प्रसिद्धीस आला आहे. उंच इमारती, सुटसुटीत रस्ते व दळणवळणाच्या सर्व सुविधांमुळे ‘कामोठेत राहण्याचे सुख मोठे’ असे म्हटले जाते. इतर नोडपेक्षा कामोठ्यातील घरांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याने गेल्या पाच वर्षांत कामोठे शहराच्या लोकसंख्येने दीड लाखाचा आकडा पार केला आहे. भविष्यात कामोठे शहर मेट्रोने जोडले जाणार असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व येणार हे नक्की.

मुंबई-पुणे महामार्गावरील डाव्या बाजूकडून कामोठे शहराचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावरच असलेल्या अक्षर बिल्डर्सच्या आलिशान उंच इमारतींनी कामोठ्यात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत होते. एरवी ग्रामपंचायतीत येणारा कामोठे नोड पनवेल महापालिका स्थापन झाल्यापासून पालिकेच्या हद्दीत येत आहे. तेव्हापासून कामोठ्यातील इमारतींच्या बांधकाम परवानग्या सिडकोऐवजी महापालिकेतून देण्यात येत आहेत. सिडकोच्या वतीने देण्यात आलेल्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मिळालेले भूखंड व गावठाण भागातील मोकळ्या जागेवर कामोठे शहर वसले आहे. पाचशे ते हजार लोकसंख्या असलेल्या गावाचे रूपांतर पाहता-पाहता दीड लाख लोकसंख्या असलेल्या शहरात झाले आहे. कामोठ्यात एकूण १ ते ३० सेक्‍टर आहेत. तेथील भूखंड खासगी विकसकांनी खरेदी केल्याने शहराच्या विकासाचा वेग वाढला. कामोठ्यात सात ते चौदा मजल्यांपर्यंत इमारती असून चौरस फुटाचा दर सहा ते सहा हजार सातशे रुपयांपर्यंत जातो. वनआरकेसह वनबीएचके आणि टूबीएचके घरे उपलब्ध आहेत.

सेक्‍टर १२, ३४, ३५, २७, २२, २४ आदी ठिकाणी रहिवाशांना हाकेच्या अंतरावर बाजारपेठ उपलब्ध आहे. बाजार, शाळा आणि रिक्षाची सोय असल्याने कामोठ्यातील सेक्‍टर ३४, १२ व २४ मधील घरांना सर्वाधिक मागणी आहे. कामोठे सेक्‍टर १२ मध्ये ग्रे-स्टोन स्पेसस ग्रुपचा १४ मजल्यांचा ‘ग्रे-स्टोन हाईट’ प्रकल्प तयार आहे. ‘अक्षर’च्या १३ मजली ‘जिओमॅट्रिक’चा पाच इमारतींच्या संकुलातील घरांची पूर्णपणे विक्री झाली आहे. प्रतीक एंटरप्रायजेसचा सात मजली आणि पाच इमारतींचे ‘प्रतीक हेरिटेज’ संकुल ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आहे. कामोठे नोडमधील बहुतांश विकसक ‘रेरा’ कायद्यान्वये नोंदणीकृत असल्याने ग्राहकांना पारदर्शक विक्री-खरेदी व्यवहार मिळत आहे. सध्या सरकारच्या धोरणानुसार भूकंपरोधी इमारती तयार करण्याकडे विकसकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार व मजबूत बांधकाम असलेली घरे उपलब्ध होत आहेत.

५० लाखांत प्रशस्त वन-बीएचके
कामोठे नोडमध्ये साधारण ५० लाखांत ६६० ते ७८५ चौरस फुटांचे वन-बीएचके घर मिळते. विकसकांकडून ग्राहकांना वन-बीएचकेमध्ये हॉलला गॅलरीही दिली जात आहे. ९५० चौरस फुटांचे टू-बीएचके घर ८० लाखांपर्यंत उपलब्ध आहे. ग्राहकांना दर्जेदार राहणीमान मिळावे म्हणून मास्टर बेडरूम, जीम, गार्डन, पोडियम, क्‍लब हाऊस आदी सुविधा पुरवल्या जात आहेत. काही इमारतींमध्ये तर विकसकांनी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन वास्तुशास्त्रानुसार खेळती हवा असणारी नियोजनबद्ध घरे बांधली आहेत. 

मेट्रोने जोडणार
सिडकोच्या वतीने नवी मुंबईत तयार होत असलेली फेज दोन प्रकल्पातील मेट्रो तळोजा-खांदेश्‍वर मार्गावरून धावणार आहे. त्या ठिकाणी कामोठे शहर असल्याने तेथील रहिवाशांना मेट्रोची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रो मार्गाने प्रवाशांना तत्काळ मुंबई गाठता येणार आहे.

दोन्ही बाजूंनी दळणवळण सुविधा
कामोठ्याच्या एका बाजूला मुंबई-पुणे महामार्ग आहे. दुसऱ्या बाजूला मानसरोवर व खांदेश्‍वर अशी दोन रेल्वेस्थानके आहेत. दोन्ही स्थानके शंभर मीटरच्या अंतरावर असल्याने चालत जाता येते. एनएमएमटीची बस आणि रिक्षा अशा दोन्ही वाहतुकीच्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत. 

कामोठे नोड विकसनशील नसून पूर्णपणे विकसित झालेला आहे. त्यामुळे ग्राहकांना घर खरेदी केल्यानंतर ताबा घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. खरेदीची प्रक्रिया झाल्यानंतर तत्काळ घरात राहता येणार आहे. कामोठे नोड राहण्यासाठी सर्व पर्यायांनी सर्वोत्तम आहे.
- अब्दुल गनी दादन (संचालक, ग्रे स्टोन स्पेसस)

कामोठे शहर राहण्यासाठी अन्‌ गुंतवणुकीसाठीही सर्वोत्तम पर्याय आहे. सर्व प्रकारची व आकाराची घरे शहरात उपलब्ध आहेत. त्यात गुंतवणूक केली तरी काही वर्षांतच तिप्पट रक्कम मिळेल. 
- विजय कणसे (एमडी, नीलकमल बिल्डर्स)

कामोठ्याला कनेक्‍टिव्हिटी चांगली आहे. तिथे राहणाऱ्यांना तत्काळ मुंबई, पुणे वा कोकणात जाता येते. महामार्गाजवळ असल्याने कामोठेचा सर्वात जलद विकास झाला. गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केल्यास दोन वर्षात चांगले रिटर्न्स मिळतील. 
- संतोष पाटील (भागीदार, श्री बिल्डर्स)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com