फेरीवाल्यांविरोधात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कल्याण - कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवालामुक्त करा, असे आदेश आयुक्त पी. वेलारसू यांनी दिल्यानुसार पालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (ता. १२) झालेल्या या कारवाईदरम्यान शेकडो हातगाड्या तोडण्यात आल्या.

कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरामधील पदपथ आणि स्कायवॉकवर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने चालणे कठीण झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यावर आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत तंबी दिल्यावर अधिकारी कुलकर्णी यांनी कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात कल्याण रेल्वेस्थानक परिसर, दीपक हॉटेल, स्कायवॉक, तहसील कार्यालय परिसरातील पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली. 

सेल्फी का जमाना है...
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलारसू आठवड्यातील काही दिवस मुंबईतील निवासस्थानी जातात. येताना पालिकेचे वाहन न वापरता ते लोकलने प्रवास करतात. येताना कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानकाबाहेरील स्कायवॉकची पाहणी करत पालिका मुख्यालयात जातात. मागील आठवड्यातही त्यांनी कल्याणमधील स्कायवॉकवर फेरफटका मारला. या वेळी चक्क सेल्फी काढले. त्यात त्यांच्या पाठीमागे फेरीवाले होते. हेच फोटो दाखवून त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतल्याने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू झाल्याचे समजते.

कल्याण स्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवालामुक्त करण्याच्या आदेशानुसार मंगळवारपासून फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू झाली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दोन सत्रात विशेष पथकातर्फे ती सुरू राहील.
- विनय कुलकर्णी, क प्रभाग क्षेत्र अधिकारी, पालिका