कल्याणमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

कल्याण - कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर आणि स्कायवॉकवरील फेरीवाल्यांविरुद्ध महापालिकेच्या विशेष पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. पोलिस बंदोबस्तात कारवाईसाठी गेलेल्या पथकप्रमुख दामोदर साळवी आणि एका कर्मचाऱ्याला गुरुवारी (ता. 22) मारहाण करण्यात आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्तांनी मुजोर फेरीवाल्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

कल्याण पश्‍चिमेतील रेल्वेस्थानक परिसर व स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी बेकायदा ठाण मांडले आहे. या फेरीवाल्यांवर 15 दिवसांत कारवाई न झाल्यास हक्कभंग आणण्याचा इशारा आमदार नरेंद्र पवार यांनी दिला होता. महासभेतही हा विषय गाजला होता. बुधवारी (ता. 21) अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी या संदर्भात पालिका अधिकारी, पोलिस व वाहतूक पोलिसांची बैठक घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून पालिकेच्या विशेष पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. दुपारी 1.45 वाजता साधना हॉटेलजवळ आंबा विक्रेत्याच्या गाडीवर कारवाई सुरू असताना फेरीवाल्याने विरोध केला. त्याने आरडाओरड करून इतरांनाही बोलावले. त्यानंतर या सर्वांनी साळवी आणि अन्य एका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर या परिसरात काही वेळ तणाव होता. 

पालिकेचे विशेष पथक 
कल्याण रेल्वेस्थानक परिसरामधील काही प्रमुख रस्ते आणि स्कायवॉकवर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. यात पोलिस व 10 कर्मचारी असतील. कारवाई करण्यात आलेले फेरीवाले बसणार नाहीत, याची जबाबदारी या पथकावर असेल. पोलिस कमी पडतील, तेथे खासगी सुरक्षा रक्षकांचे पथक काम करील. याबाबत स्थायी समिती आणि महासभेसमोर प्रस्ताव पाठवणार असल्याचे संजय घरत यांनी सांगितले. 

विशेष पथकाद्वारे फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी कायदा हातात घेऊ नये. फेरीवाल्यांविरोधातली कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आगामी काळात फेरीवाला धोरणाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 
- संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका.