बोटीमुळे कोकणवासी सुखावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुंबई - महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) सुरू केलेल्या भाऊचा धक्का ते दिघी या जलप्रवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिघी जेट्टीवर प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सेवेच्या पहिल्याच दिवशी पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांनी बोटसेवेचा लाभ घेतला.

मुंबई - महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) सुरू केलेल्या भाऊचा धक्का ते दिघी या जलप्रवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिघी जेट्टीवर प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सेवेच्या पहिल्याच दिवशी पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांनी बोटसेवेचा लाभ घेतला.

दिवाळीदरम्यान कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक वाढते. त्यामुळे महाराष्ट्र सागरी मंडळाने पहिल्यांदाच या काळात मुंबई ते दिघी-दाभोळ या जलप्रवासाला सुरुवात केली. एमएमबीचे सीईओ अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन संजय शर्मा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी भाऊच्या धक्‍क्‍यावर उपस्थित होते. सकाळी ९ वाजता ‘एमव्ही केपीएस’ आणि दुपारी ‘एमव्ही रावी’ या दोन बोटी दिघीला रवाना झाल्या. बोटीतील वातानुकूलित यंत्रणा आणि स्वच्छ शौचालयांमुळे प्रवाशांना जलप्रवासाचा आनंद लुटता आला. सध्या एसटीचा संप सुरू आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. 

पहिल्यांदाच दिघी जेट्टीवर बोट येणार असल्याने मुरूड, म्हसळा, महाड येथून नागरिक जमले होते. दिघीच्या सरपंच सुमती चिकाटी यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन स्वागत केले. सायंकाळी ‘एमव्ही केपीएस’ ही बोट २० प्रवाशांना घेऊन मुंबईला रवाना झाली. रात्री ‘एमव्ही रावी’ ही बोट २१ प्रवाशांना घेऊन भाऊच्या धक्‍क्‍यावर आली. या बोटीत १० पर्यटकही होते, असे दिघीचे बंदर निरीक्षक अरविंद सोनावणे यांनी सांगितले. 

मुंबई-दिघी प्रवासाला सुरुवात झाली आहे. अल्पकाळात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काळात प्रतिसाद आणखी वाढेल. कोकणातील जलवाहतुकीचे नवीन पर्व सुरू झाले आहे.
- अतुल पाटणे (सीईओ, एमएमबी)