कृतिकाचा खून पैशांच्या वादातून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई - अभिनेत्री कृतिका चौधरीच्या खूनप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने दोघांना अटक केली आहे. शकील नसीम खान आणि बादशहा ऊर्फ बासुदास माकमलाल दास अशी त्यांची नावे आहेत. त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शकीलने वर्षभरापूर्वी कृतिकाला अमली पदार्थ पुरवले होते. त्याच्या पैशांच्या वादातून शकील आणि बासुदासने कृतिकाचा खून केल्याचे उघड झाले आहे.

मूळची उत्तर प्रदेशची असलेली कृतिका मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने मुंबईत आली होती. तिने काही मालिकांतही काम केले होते. खून होण्यापूर्वी ती सहायक निर्माती म्हणून काम करत असे. महिन्याभरापूर्वी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तिच्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला होता.

तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी परिमंडल नऊचे उपायुक्त परमजितसिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, उदय राजेशिर्के, उपनिरीक्षक दया नायक या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने कृतिकाचा फोन ताब्यात घेतला होता. त्यातील मोबाईल क्रमांकांच्या आधारे पोलिसांनी काही जणांची चौकशी केली होती.

कृतिकाला अमली पदार्थांचे व्यसन होते, असे तपासात उघड झाले होते.
पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर ती अंधेरीतील भैरवनाथ सोसायटीत एकटीच राहत होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये शकीलने कृतिकाला "एमडी' (म्यॉव म्यॉव) हा अमली पदार्थ दिला होता. त्याचे सहा हजार रुपये कृतिकाने शकीलला दिले नव्हते. तिला अमली पदार्थ विकल्यानंतर काही दिवसांनी शकीलला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने पैशांसाठी कृतिकाचा शोध घेण्यास सुरवात केली होती. कृतिकाचा खून झाला त्या दिवशी शकील बादशहासोबत तिच्या घरी गेला होता. त्या वेळी तिचा त्यांच्याशी वाद झाला. त्या वेळी शकीलने लोखंडी मुठीने तिच्या डोक्‍यावर प्रहार केला. नंतर बादशहाने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिची सोनसाखळी व अंगठी घेऊन शकील पनवेलला, तर बादशहा गोवंडीला गेले होते.

पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. शकीलने लोखंडी मूठ कोठून विकत घेतली, याचा तपास पोलिस करत आहेत.