शाळेने दिला आसरा; लोकांनी केला कचरा

शाळेने दिला आसरा; लोकांनी केला कचरा
शाळेने दिला आसरा; लोकांनी केला कचरा

मिठीशेजारच्या क्रांती नगरच्या रहिवाशांची अशीही

मुंबई: मुंबई 29 ऑगस्टच्या जलप्रलयानंतर रुळांवर येत असताना काही कटू अनुभवही येत आहेत. कुर्ल्यातील एका शाळेचा आसरा घेतलेल्या झोपडीवासीयांनी एका दिवसात शाळेच्या खोल्यांचे डम्पिंग ग्राऊंड केले. शिळे अन्नपदार्थ, कपडे व इतर टाकाऊ वस्तू वर्गांमध्ये तशाच ठेवून ते आपल्या घरी गेले.

कुर्ला-पश्‍चिमेला असलेल्या शेठ ईश्‍वरदास भाटिया हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग शुक्रवारी (ता. 1) भरलेच नाहीत. तळमजल्यावरील प्राथमिक वर्गात चिखल, तर पहिल्या मजल्यावरील वर्गांमध्ये दुर्गंधी होती. सात दिवसांची गणपतीची सुट्टी संपल्यावर वर्ग उघडताच त्यांचे डम्पिंग ग्राऊंड झाल्याचे निदर्शनास आले. शाळेची ही अवस्था पाऊस आणि तेथे आसरा दिलेल्या झोपडीवासीयांनी केली.

शाळेने मंगळवारी (ता. 29) आपल्या माध्यमिक विभागाच्या 12 वर्गांमध्ये मिठी नदीजवळील क्रांती नगरच्या रहिवाशांना आसरा दिला. लोकप्रतिनिधी आणि नजीकच्या रहिवाशांनी त्यांना अन्न दिले. कपडेही दिले. परंतु, एका रात्रीत क्रांती नगरच्या रहिवाशांनी वर्गांचे डम्पिंग ग्राऊंड केले. तेथे उष्टे अन्नपदार्थ टाकले. कचराही इतस्ततः फेकला. पाऊस थांबला. पाणी ओसरले आणि शाळेची साफसफाई न करताच रहिवासी घरी निघून गेले.

शाळा आज उघडल्यानंतर वर्गांची दशा पाहून शिक्षक आणि अन्य कर्मचारी अवाक्‌ झाले. हा कचरा त्वरित उचलणे शक्‍य नव्हते. त्यामुळे शाळेने दोन्ही अधिवेशनांतील विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने एल प्रभागाचे नगरसेवक संजय तुर्डे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली. महापालिकेच्या सफाई कामगारांनी दिवसभर राबून वर्गांची साफसफाई केली.

माणुसकीच्या नात्याने 26 जुलै 2005 च्या प्रलयातही शाळेने झोपडीवासीयांना आसरा दिला होता. आताही आम्ही झोपडीवासीयांना आसरा दिला. लोकप्रतिनिधींनी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची स्वच्छता करून देणे आवश्‍यक होते.
- के. एस. पिंजरकर, मुख्याध्यापिका

एल प्रभागात मनुष्यबळाची कमतरता होती. स्वच्छता कामगार गुरुवारपासून मिळाले. आता शाळेची साफसफाई करून देण्यात आली आहे.
- संजय तुर्डे, नगरसेवक, एल वॉर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com