रियाजला जन्मठेप देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

मुंबई - बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्याप्रकरणी रियाज सिद्दिकी याला जन्मठेप देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष टाडा न्यायालयात केली. महत्त्वाचे म्हणजे, विशेष टाडा न्यायाधीश जी. डी. सानप यांनी गुरुवारी (ता. 7) मुंबई बॉंबस्फोट प्रकरणात दोषी असलेल्या रियाजला दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

अबू सालेमच्या सांगण्यावरून प्रदीप जैन यांची हत्या सात मार्च 1995 रोजी करण्यात आली होती. रियाज सिद्दिकीवर हा कट रचल्याचा आरोप असून, टाडा न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. रियाजच्या शिक्षेबाबतच्या युक्तिवादाला शुक्रवार (ता. 8) पासून सुरवात झाल्यानंतर सरकारी वकिलांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची मागणी केली.

जैन हत्या प्रकरणात अबू सालेम, मेहंदी हसन शेख, वीरेंद्र कुमार झांब या आरोपींना यापूर्वीच जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात रियाज सुरवातीला माफीचा साक्षीदार बनला होता. मात्र, नंतर त्याने जबाब बदलला. त्यामुळे त्याच्याविरोधात खटला सुरू करण्यात आला होता. विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. त्यानंतर 2005 मध्ये अबू सालेमला पोर्तुगालहून, तर 2006 मध्ये रियाज सिद्दिकीचे यूएईमधून प्रत्यार्पण करण्यात आले होते.

रियाज सिद्दिकीची शेरोशायरी
रियाज सिद्दिकीला जन्मठेप देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केल्यानंतर या शिक्षेबाबत तुला काही सांगायचे आहे का, असे विचारत रियाजला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावण्यात आले. त्या वेळी त्याने मला निकम साहेबांना काही सांगायचे आहे, असे सांगत एक शेर ऐकवला. ऍड. निकम यांनीही खूष होत, आता जज साहेबांसाठी काही ऐकव, असे सांगताच रियाजने न्या. सानप यांचे कौतुक करणारा दुसरा शेर ऐकवला.