संतप्त नागरिकांमुळे कारवाई मागे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

शिवडी - शिवडी क्रॉस रोड ते ज्ञानेश्‍वर नगरदरम्यान पालिकेच्या जागेत वर्षानुवर्ष भाडेकरू म्हणून वास्तव्य करणाऱ्या भाडेकरूंचा पाणीपुरवठा आणि विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी बुधवारी (ता. १३) परळ येथील एफ दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी विनानोटीस अचानक हजेरी लावली. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी विरोध करीत पालिका अधिकाऱ्यांचा कारवाईचा डाव हाणून पाडला. या जागेबाबतचे प्रकरण टेक्‍निकल एडवायसरी कमिटी (टॅक)कडे अंतिम निर्णयासाठी प्रलंबित असतानाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्यांतर्गत आमचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे, असा संतप्त प्रश्‍न येथील रहिवाशांनी केला.

महापालिकेच्या एफ दक्षिण विभागातील शिवडी क्रॉस रोड ते ज्ञानेश्‍वर नगरदरम्यान महापालिकेच्या २३ ठिकाणी मालमत्ता आहेत. यावर १९१ भाडेकरू वास्तव्य करत आहेत. त्यापैकी १०१ व्यवसायक व गाळेधारक असून ९० रहिवासी आहेत. या वास्तू अतिधोकादायक (सी १) श्रेणीतील असल्याने पालिकेच्या वतीने घरे रिकामी करण्यासंदर्भात जून २०१७ मध्ये भाडेकरूंना नोटीस बजावली होती. यावर येथील भाडेकरूंनी आम्ही राहत असलेली वास्तू पूर्णपणे सुस्थितीत असल्याचा ऑडिट रिपोर्ट पालिका आणि टॅककडे सादर केला. टॅकच्या अंतिम निर्णयाची सूची अद्याप तयार झालेली नाही. त्या आधीच पालिका हस्तक्षेप करून रहिवाशांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई का करत आहे, असा प्रश्‍न रहिवाशांनी केला. टॅकचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कारवाई थांबवावी, अशी मागणी करत रहिवाशांनी पालिकेचा डाव हाणून पाडला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार कालिदास कोळंबकर यांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांच्या मदतीने वातावरण शांत केले.

एफ दक्षिण विभागातील अनेक इमारती अतिधोकादायक आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पालिका चाळधारक भाडेकरूंवर कारवाई का करत आहे? आम्ही चाळीत वास्तव्य करत असून, अनेकांच्या पत्र्याच्या चाळी आहेत. त्यामुळे आम्हाला कोणताही धोका नाही. 
- रफिक पटेल, रहिवासी

भाडेकरूंवरील कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्पुरती थांबवण्यात आली आहे. सर्वांचे ऑडिट रिपोर्ट पाहून टेक्‍निकल एडवायसरी कमिटीच्या निर्णयानुसार चाळधारक व इमारतीतील भाडेकरू यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- विश्‍वास मोटे, सहायक आयुक्त, एफ दक्षिण विभाग