"रेल रोको' करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 

"रेल रोको' करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 

मुंबई - महाराष्ट्र बंददरम्यान पश्‍चिम रेल्वेवरील विरार, नालासोपारा, मालाड आणि गोरेगाव स्थानकांत झालेल्या "रेल रोको' आंदोलनाप्रकरणी सायंकाळी बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

बंददरम्यान आंदोलकांनी विरार स्थानकातून "रेल रोको' आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी रुळांवर उतरून घोषणाबाजी सुरू केल्याने लोकलसेवा विस्कळित झाली. आंदोलनाचे हे लोण नालासोपारा आणि भाईंदर स्थानकातही पोचले. तेथे झालेल्या रेल रोकोमुळे चर्चगेटला जाणाऱ्या लोकल एकामागोमाग उभ्या होत्या. सकाळी 9.45च्या सुमारास गोरेगाव स्थानकातही रेल रोको करण्यात आला. हे आंदोलन तासभर सुरू होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि बोरिवली रेल्वे पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर काही वेळाने लोकलसेवा सुरू झाली. 

गोरेगावच्या घटनेनंतर दुपारी 1.45 वाजता मालाड रेल्वेस्थानकात आंदोलकांनी घोषणाबाजी करत चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. ते सुमारे अर्धा तास रुळांवर ठाण मांडून बसले होते. अर्ध्या तासाने पुन्हा आंदोलकांनी बोरिवलीच्या दिशेला जाणाऱ्या लोकलच्या मार्गावर आंदोलन केले. दरम्यान, रेल रोकोप्रकरणी पोलिस सीसी टीव्हीच्या माध्यमातून तपास करत आहेत. 

बंदमुळे हाल 
वरळी - आंदोलकांनी वरळी नाक्‍यावर "रास्ता रोको' करून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद पाडली. 
दादर - दादर रेल्वे स्थानकाबाहेर जमावाने "रास्ता रोको' केला. त्यांनी लोकल सेवाही सेवा बंद पाडली. 
शीव - "रास्ता रोको'मुळे दक्षिण मुंबईकडे तसेच पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प. 
कुर्ला - पूर्व द्रुतगती तसेच लाल बहादूर शास्त्री मार्गावर वाहतूक बंद. "रेल रोको' 
चेंबूर - आंदोलकांनी चेंबूर नाका आणि लोखंडे मार्गावर आंदोलन करून वाहतूक बंद केली. "रेल रोको' 
गोवंडी - शेकडोंच्या जमावाचा "रेल रोको' 
घाटकोपर - लाल बाहदूर शास्त्री मार्गावर खासगी वाहनांवर दगडफेक, "बेस्ट'च्या काही बसची तोडफोड. पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर डेपो, रमाबाई कॉलनी आणि कामगार नगर येथे रास्ता रोको. घाटकोपर स्थानकात रेल रोको. 
विक्रोळी - लाल बहादूर शास्त्री मार्गावर वाहनांची तोडफोड. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद 
पवई - जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. "रास्ता रोको'ही केला. 
कांजूरमार्ग - रेल्वे स्थानकात प्रचंड नासधूस 
मुलूंड - आंदोलकांनी पूर्व द्रुतगती मार्गावर आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग ठप्प पाडले. 
धारावी - आंदोलकांनी टी जंक्‍शन येथे वाहतूक बंद पाडली. 
वांद्रे (कलानगर) - आंदोलकांचा जंक्‍शनवर ठिय्या 
कांदिवली - आंदोलकांनी पश्‍चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक अडवली. 
गोरेगाव-मालाड - आंदोलकांनी प्रमुख मार्गांवरील वाहतूक अडवली. 
दहिसर - लांब पल्ल्यांच्या एक्‍स्प्रेसवर दगडफेक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com