आठवलेंना पक्ष कार्यकर्त्यांचा घरचा आहेर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा युवक आघाडी, तसेच महिला आघाडी बरखास्त केली आहे, या प्रकाराबाबत आठवले यांनी नाराजी व्यक्त केल्याचे रोकडे यांनी सांगितले.

डोंबिवली : वर्षानुवर्षे महत्त्वाची पदे उपभोगून आंबेडकरी विचारांच्या व तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावंतांचा आता विसर पडू लागला असून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत आरपीआय उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांनी डोंबिवली येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

आता वेगळा विचार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले, तसेच पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी करत आठवलेंना पक्ष कार्यकर्त्यांनी घरचा आहेर दिला आहे. 

तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव सोमवारी (ता.29) डोंबिवलीत संध्याकाळी सहा वाजता साजरा होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपाई अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष माणिक उघडे यासह पदाधिकारी महाराष्ट्र राज्याची नवीन कार्यकारिणीबाबत पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. 

जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा युवक आघाडी, तसेच महिला आघाडी बरखास्त केली आहे, या प्रकाराबाबत आठवले यांनी नाराजी व्यक्त केल्याचे रोकडे यांनी सांगितले. 

तरीही पक्षाकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही, जाधव हे फक्त पद उपभोगत असल्याची टीकाही त्यांनी केली. याबाबत पक्षाध्यक्षांनी जिल्हा प्रमुखांची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे. आठवले याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष संग्राम मोरे, महिला जिल्हा अध्यक्ष मीना साळवे, युवा जिल्हा शहर अध्यक्ष विकास खैरनार, कल्याण शहर अध्यक्ष संतोष जाधव यावेळी उपस्थित होते.