महारेरा नोंदणीला मुदतवाढ नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई - महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटीने (महारेरा) विकसकांना प्रकल्प नोंदणीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही, असा इशारा ऍथॉरिटीचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी विकसकांना दिला. आजवर सुमारे 300 प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली असून, महिनाअखेर तब्बल 20 हजार प्रकल्पांची नोंदणी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

"सीआयआय रिऍल्टी ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर समिट'च्या वेळी शुक्रवारी चॅटर्जी बोलत होते. ते म्हणाले, 'या प्रक्रियेत आम्ही पारदर्शकता आणू इच्छितो आणि त्यासाठी विकसकांनी 31 जुलैपूर्वी या प्रक्रियेसाठी सज्ज झाले पाहिजे. म्हणूनच 31 जुलैची अंतिम मुदत वाढवण्याचा कोणताही विचार नाही. रेरा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आणि प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.''