शेट्ये मारहाणप्रकरणी तपास अहवाल न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - भायखळा तुरुंगातील वॉर्डन कैदी मंजुळा शेट्ये मारहाणप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सत्र न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींनी केलेल्या जामीन अर्जावर 16 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

पोलिस अधिकारी मनीषा पोखरकर, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिनगे, बिंदू नायंकडे यांच्यावर कैदी मंजुळा शेट्ये हिला मारहाण केल्याचा व त्यात तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी सहा जणींनी सत्र न्यायालयात 26 जुलैला जामीन अर्ज केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयातही याचिका दाखल असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सत्र न्यायालयात याबाबतचा तपास अहवाल सादर केला. घरात लहान मुले असल्याने त्यांना सांभाळण्यासाठी न्यायालयाने जामीन मंजूर करावा, अशी मागणी अर्जात केली आहे.

शेट्ये हिच्या गुप्तांगात काठी घुसविल्यामुळे झालेल्या रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला होता; मात्र तपासात तिच्या शरीरावर अशा खुणा नसल्याचे म्हटले आहे. हा मुद्दा उचलून धरत, या सहा पोलिस अधिकाऱ्यांनी जामीन अर्ज केला आहे. या प्रकरणातील पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून, आणखी पोलिस कोठडी आवश्‍यक नसल्याचे पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केल्यामुळे या सहा जणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.