मराठा मोर्चाला संमिश्र प्रतिसाद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने नऊ ऑगस्टला मुंबईतल्या राज्यव्यापी महामोर्चाची घोषणा केल्यानंतरही प्रा. संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा मोर्चाच्या केलेल्या आयोजनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. "सकल मराठा क्रांती मोर्चा' या नावाने आजचा मोर्चा पुकारला होता; मात्र, काही मोजक्‍या मराठा नेत्यांनी यामध्ये पुढाकार घेतल्याने मराठा समाजाने याकडे पाठ फिरवली. जेमतेम दोनशे ते अडीचशे जणांची गर्दीच यावेळी आझाद मैदानात जमली होती. यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

सरकारने तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा. या महिन्यापासूनच शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणानुसार मराठा समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, सरकारच्या वतीने अधिकाऱ्यांनी मोर्चाच्या आयोजकांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री जोपर्यत भेटून आरक्षणाचा निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा निर्णय यामध्ये सहभागी पदाधिकाऱ्यांनी घेतला.