बाळासाहेबांना अभिवादन : स्मृतिस्थळावर शिवसैनिक नतमस्तक

Mumbai news Marathi news balasaheb thackeray fifth death anniversary
Mumbai news Marathi news balasaheb thackeray fifth death anniversary

दादर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (ता. 17) शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर राज्यभरातून आलेले शिवसैनिक नतमस्तक झाले. 

वाळूच्या शिल्पातून श्रद्धांजली
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर वाळूचे शिल्प साकारून लक्ष्मी गौड-कांबळे यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. हे शिल्प पाहून महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी त्यांचे कौतुक केले. लक्ष्मी जुहू चौपाटीवर वाळूची शिल्पे साकारून जनजागृती करतात. दर वर्षी महापरिनिर्वाण दिनालाही त्या जुहू चौपाटीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाळूशिल्प साकारतात. लक्ष्मी म्हणाल्या, "बाळासाहेब हयात असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी एकदा जुहू चौपाटीवर त्यांचे शिल्प साकारले होते. ते गेल्यानंतर एकदा शिल्प साकारले आणि त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनी स्मृतिस्थळावर वाळूचे शिल्प साकारण्याची इच्छा होती...''

साहेब परत या!
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले होते. काहींनी गुरुवारपासूनच स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी रांग लावली होती. शिवाजी पार्क परिसरात सर्वत्र बॅनर लावून, रांगोळी काढून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बाळासाहेबांसाठी सायकलप्रवास
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी दत्ता परुळेकर हे शिवसैनिक सायकलप्रवास करीत दादरला येतात. स्मृतिस्थळ दर्शन झाल्यानंतर ते मातोश्रीवरही जातात. पाच वर्षांत खंड पडलेला नाही. परुळेकर यांची सायकल, सायकलवर लावलेली बाळासाहेबांची प्रतिमा हे सारेच अन्य शिवसैनिकांच्या आकर्षणाचा विषय आहे. पुण्यातून बाईकने आलेले मोहन यादव हेही शिवसैनिकांचे आकर्षण. ते 19 वर्षांपासून बाईकने दसरा मेळाव्याला आणि आता पाच वर्षांपासून स्मृतिस्थळावर येतात. ते सांगतात, "माझी गाडी बघण्यासाठी खास बाळासाहेब मातोश्रीबाहेर आले होते. त्यांना दाखवण्यासाठी मी बाईक घेऊन मातोश्रीवर गेलो होतो. गाडीच्या सर्व बाजूनी केलेली सजावट मी शिवसैनिक असल्याची आठवण मला वारंवार करून देते.'' 

आठवले बाळासाहेब!
शिवाजी पार्कवर आज शिवसैनिकांची गर्दी होती. बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना अनेकांना गहिवरून आले. आज बाळासाहेब असते तर... अशा भावना त्यांच्या मनात असताना अचानक बाळासाहेबांसारखी वेशभूषा करून एक शिवसैनिक स्मृतिस्थळाजवळ आला. त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. लोकांच्या नजरा खिळल्या. अनेक जण सेल्फीसाठी पुढे आले. त्यांना पाहून बाळासाहेब आल्याचा भास झाल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. 
कांदिवली, चारकोप येथील कांतिभाऊ मिश्रा केशरी सदरा, पांढरा पायजमा, रुद्राक्ष माळ, बाळासाहेबांसारखाच गॉगल आणि दाढी अशा वेशभूषेत आले होते. 60 वर्षीय कांतिभाऊ एक सामान्य शिवसैनिक आहेत. काही महत्त्वाचा कार्यक्रम असल्यास ते बाळासाहेबांसारखी वेशभूषा करतात. कांतिभाऊ सांगतात, ""मी मूळचा पुण्याचा. 25 वर्षे मुंबईत राहतो. महर्षी नगर स्वारगेट येथे बाळासाहेब यांचा फ्लॅट आहे. मी पुण्याला असताना अनेकदा त्यांना भेटलो आहे. आजही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीवर जातो.

बसची व्यवस्था
शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बेस्ट बस सोडण्यात आल्या होत्या. दादर रेल्वेस्थानक (पश्‍चिम) आणि दादर हिंदू स्मशानभूमीदरम्यान शिवाजी पार्क मार्गे सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बेस्ट बसच्या खास फेऱ्या चालवण्यात आल्या. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे दोन लाख शिवसैनिकांची चहा, नाश्‍ता आणि जेवणाची सोय शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com