जवान आणि शेतकरी मरतोय; सरकार खुशाल! : राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 जून 2017

राज ठाकरे म्हणाले.. 

  • शेतकऱ्यांचा राग लक्षात घ्या; या आंदोलनाला पक्षीय लेबल चिकटवू नका. 
  • शेतकऱ्यांचा राग दोन-चार दिवसांत विझता कामा नये. 
  • योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान व्हायचे आहे. म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफीची घोषणा केली. 
  • भारत-पाकिस्तान सामने आनंदाने बघा; पण त्या स्टेडियममध्ये हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी एक स्टॅंड बांधा. त्यांनाही कळू द्या देशात काय चालू आहे ते! 

मुंबई : 'सीमेवर जवान आणि देशात शेतकरी रोज मरत आहेत. तरीही भाजपचे हे सरकार खुशाल आहे. फक्त थापा मारून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेले हे सरकार काहीही कामाचे नाही', अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) केली. राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाला मनसेने पाठिंबा दिला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, 'या संपाला माझा पाठिंबा आहे. पण गिरणी कामगारांचे जे झाले, ते या शेतकऱ्यांचे होऊ नये. हे सरकार थापा मारून सत्तेवर आले आहे. 'कर्जमाफी देता येणार नाही' हे विरोधी पक्षात असताना यांना माहीत नव्हते का? कॉंग्रेस आघाडीचे सरकार घालविण्यासाठी भाजपने जनता, शेतकऱ्यांची फसवणूक केली. 'खोटे बोललो' म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मुख्यमंत्री कर्जमाफी जाहीर करू शकतात; पण ते मनावर घेत नाहीत.'' 

'सध्याचे सत्ताधारी सतत खोटे बोलत असतात' असा आरोपही राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला. 'तीस हजार विहिरी बांधल्या, असे सरकार सांगते. पण कुठे बांधल्या, हे सांगत नाही,' असा बोचरा सवाल राज यांनी उपस्थित केला. 'फक्त कर्जमाफी देऊन हा प्रश्‍न सुटणार नाही. स्वामिनाथन समितीच्या अन्य शिफारसीही अंमलात आणल्या पाहिजेत. सरकारने घोषणा करून ठेवल्या आहेत; पण पैसे नाहीत. योजनांना मात्र गोंडस नावे दिली आहेत. कुठल्याही क्षणी जवानांचे प्राण जातील, अशी सीमेवर परिस्थिती आहे. त्या जवानाला तिथे सीमेवर काय वाटत असेल? ज्या देशाने सैनिकांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे, तो देश क्रिकेट सामने पाहण्यात गुंग आहे,' अशी टीका राज यांनी केली.