वाढीव गुणांमुळे अभ्यासू मुलांवर अन्याय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - राज्यभरात शंभरी पार केलेल्या विद्यार्थ्यांबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असताना वाढीव गुणांच्या या शिक्षणखात्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञ नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्णयामुळे अकरावी प्रवेशात अभ्यासू मुलांवर अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

मुंबई - राज्यभरात शंभरी पार केलेल्या विद्यार्थ्यांबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असताना वाढीव गुणांच्या या शिक्षणखात्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञ नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्णयामुळे अकरावी प्रवेशात अभ्यासू मुलांवर अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

दादरच्या बालमोहन शाळेतील अबोली बोरसे या विद्यार्थीनाला 96.05 टक्के गुण मिळाले. कला विषयांतील अतिरिक्त गुणांच्या आधारावर तिला शंभर टक्के मिळाले. तर धारावीतील झोपडपट्टीत राहणा-या वेटरची मुलगी कविता नाडरला 96 टक्के मिळाले. या दोन्ही विद्यार्थीनींच्या दहावी परीक्षेतील टक्‍क्‍यांमध्ये फारसा फरक नसला अबोलीला वाढीव गुणांमुळे महाविद्यालयीन प्रवेशात सर्वप्रथम प्राधान्य मिळाले आहे. ही परिस्थिती अकरावी महाविद्यालयीन प्रवेशांत दिसून येणार आहे.

राज्य बोर्डातील मुलांना दरवर्षी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या मुलांमुळे अकरावी प्रवेशात मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. अकरावी महाराष्ट्र बोर्डात प्राधान्यक्रमाने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याबाबत कित्येक वर्षांपासून वाद सुरु आहे. त्यात यंदापासून क्रीडा आणि कलाक्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिल्याची तरतूद करण्यात आली. परिणामी परीक्षेच्या आधारावर 95 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मार्क मिळत टक्केवारी शंभरीवर पोहोचली. मुंबईत या वाढीव गुणांचा तब्बल 16 हजार 938 विद्यार्थ्यांना लाभ झाला. तर राज्यभरात तब्बल 193 विद्यार्थ्यांना थेट शंभर टक्के गाठता आले. गुणांमध्ये वाढ झाल्याने या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात अडचण नसली तरीही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन प्रथम श्रेणीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी करत आहेत.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची कमी होईल, केवळ क्रीडा आणि कलेमध्ये कल वाढेल. अकरावी प्रवेश सुकर झाला तरीही भविष्यात अभ्यास कमी केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. तसेच मुलांना क्रीडा आणि कलेमध्ये नैपुण्य मिळवून देऊ या आमिषावर अनेक खासगी स्पोर्टस क्‍लब, नृत्याचे क्‍लासेस यांना पेव फुटेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. याऐवजी अकरावी प्रवेशातील क्रीडा, कला कोट्यांतील वाढ अधिक योग्य ठरेल, असे ते म्हणाले.