मराठीचा बाळगा सार्थ अभिमान!

मराठीचा बाळगा सार्थ अभिमान!

डोंबिवली - आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे. सभोवताली इंग्रजी भाषेचे वलय निर्माण झाल्याने मातृभाषेची कमतरता जाणवत असली तरी मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी समजण्याची अजिबात गरज नाही. याउलट त्यांनी आपली मातृभाषा मराठीचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे, या शब्दांत सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री पूजा सावंत हिने ज्युनियर लीडरला प्रोत्साहन दिले.

दै. ‘सकाळ’च्या ‘ज्युनियर लीडर स्पर्धेचे’ औचित्य साधून अभिनेत्री पूजा सावंत आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली रसिका सुनील ऊर्फ ‘शनाया’ या दोघींनी डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर विद्यामंदिर शाळेतील मुलांशी दिलखुलास गप्पा मारल्या. आपले शिक्षणही मराठी माध्यमातून झाले असून, ‘सकाळ’च्या माध्यमातून मराठी शाळेला भेट देण्याची संधी मिळाल्याचा आनंद पूजाने व्यक्त केला. मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांचे इंग्रजीही तितकेच चांगले असते. त्यामुळे कोणताही न्यूनगंड न ठेवता मराठीवरही तितकेच प्रेम करा, असा सल्ला या वेळी पूजाने मुलांना दिला.

उत्साह, जल्लोष अन्‌ गप्पांचा फड
‘सकाळ’च्या ज्युनियर लीडर स्पर्धेच्या निमित्ताने पूजा आणि रसिका या अभिनेत्री शाळेत येणार असल्याचे समजल्यावर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. त्या दोघींची शाळेत एन्ट्री होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. पूजा आणि रसिका यांच्याशी संवाद साधण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. मनातील प्रश्‍नांना वाट मोकळी करून दिली. त्यांनीही मुलांच्या प्रश्‍नांना तितक्‍याच आत्मीयतेने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी ज्युनियर लीडर स्पर्धेसह दोघींच्या आगामी ‘बसस्टॉप’ चित्रपटाविषयीही त्यांच्याकडून जाणून घेतले. 

‘शनाया’ प्रत्यक्ष जीवनात सकारात्मक
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत ग्लॅमरस आणि नकारात्मक शेड असणारी भूमिका साकारणाऱ्या रसिका ऊर्फ शनायाला एका विद्यार्थिनीने ‘जशी तू मालिकेत आहेस, तशीच रियल लाईफमध्येसुद्धा आहेस का? असा प्रश्‍न विचारताच उपस्थितांत एकच हशा पिकला. रसिकानेही शनायाच्या भूमिकेला मिळालेली ही दादच असल्याचे सांगत मालिका आणि प्रत्यक्ष जीवन वेगवेगळे असल्याचे सांगून तिच्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. तिच्यासह पूजानेही आधी अभ्यास करा आणि मगच ‘बसस्टॉप’ हा आगामी चित्रपट आवर्जून पाहा, असे सांगितले. दोघींनीही विद्यार्थ्यांसोबत फोटोसेशनचा आनंदही लुटला.
 
‘सकाळ’च्या उपक्रमाचे कौतुक
‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेतो. ज्युनियर लीडर स्पर्धेमुळे मुलांमध्ये शालेय जीवनातच वाचनाची गोडी निर्माण होऊन वाचनसंस्कृती रुजत आहे. भविष्यातील लीडर तयार होण्यासाठी ‘ज्युनियर लीडर’ या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्‍चितच फायदा होईल, असे सांगत पालकांनीही या स्पर्धेचे स्वागत केले आहे, असे स्तुत्य उपक्रम ‘सकाळ’ने कायम राबवावेत, अशा भावना टिळकनगर शाळेच्या पर्यवेक्षिका लीना ओक मॅथ्यू, शिक्षिका वीणा ठाकूर आणि अन्य शिक्षकांनी व्यक्त केल्या.

ज्युनियर लीडर ही स्पर्धा अतिशय उत्तम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून नियमित वाचनासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. उत्सुकतेपोटी मुलांचा आपणहूनच वाचनाकडे कल वाढत आहे. शालेय जीवनातच वाचनसंस्कृती रुजवण्यास मदत होत आहे. ‘सकाळ’चा उपक्रम स्तुत्य असून, ‘सकाळ’चे स्मार्ट पालक हे सदर अतिशय चांगले आहे.
- रेखा पुणतांबेकर, मुख्याध्यापिका, टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली

ज्युनियर लीडर स्पर्धेमुळे मुलांमधील नेतृत्वगुणांना वाव मिळाला आहे. त्यांच्यातील लीडरशिप शालेय जीवनातच वाढत असून, भविष्यात याचा त्यांना निश्‍चित फायदा होईल.
- रसिका सुनील, अभिनेत्री

‘सकाळ’ने हाती घेतलेला उपक्रम अत्यंत छान असून, शालेय जीवनातच मुलांवर उत्तम संस्कार होत आहेत. वाचनाची अवीट गोडी मुलांमध्ये निर्माण होणार असून, मराठी भाषा आणि मराठी वृत्तपत्र यांच्याविषयी मुलांमध्ये प्रेम, आपुलकी निर्माण होऊन त्यांचे मराठीवरील प्रेमही वाढेल.
- पूजा सावंत, अभिनेत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com