इंजिनाअभावी टळला मिनी ट्रेनचा मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

माथेरान - वर्षभरापासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याच्या हालचालींना इंजिनांतील तांत्रिक दोषांमुळे पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. ही सेवा सुरू करण्याचा १८ जूनचा संभाव्य मुहूर्तही हुकला आहे. आता किमान महिनाभर तरी मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. 

वर्षभरापूर्वी अमनलॉज स्थानकाच्यापुढे मिनी ट्रेनचे डब्बे घसरल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आणि अमनलॉज-माथेरान शटल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. पर्यटकांची; तसेच स्थानिकांची गरज लक्षात घेता ही सेवा सुरू करण्यासाठी सर्व बाजूंनी रेल्वे प्रशासनावर दबाव वाढला आहे. यातूनच मिनी ट्रेनच्या मार्गात सुरक्षिततेच्या उपाययोजना; तसेच इंजिन आणि डब्यांना एअर ब्रेक प्रणाली बसविण्यात आली आहे. या मार्गासाठी तीन नवीन इंजिन आणण्यात आली आहेत. मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी आधी १ जूनचा मुहूर्त नक्की करण्यात आला होता; पण इंजिने फेरबदलासाठी मुंबईला नेल्याने; तसेच काही महत्त्वपूर्ण उपाययोजनांअभावी हा मुहूर्त टळला होता. त्यानंतर १८ जूनला ही सेवा सुरू करण्याचे वाटत होते; तशी अधिकृत घोषणा झाली नव्हती. काही महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी कुर्ला-परळ लोकोशेडमध्ये पाठविलेले नवीन इंजिन पुन्हा आणण्यात आली आहेत. या नवीन इंजिनांची दोन दिवसांपासून या मार्गावर पुन्हा चाचणी घेण्यात आली; मात्र त्यातील दोष अजूनही दूर झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सक्षम इंजिनांअभावी शटल सेवा सुरू करणेही शक्‍य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

मिनी ट्रेन सुरू होऊ न शकण्यास इंजिनांचा अभाव हे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर माथेरान स्थानकात कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही; तसेच स्थानकात अस्वच्छताही पसरली आहे.