कोट्यवधींची औषधे जातात कुठे? 

कोट्यवधींची औषधे जातात कुठे? 

नवी मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने डॉक्‍टर रुग्णांना बाहेरून औषधे आणायला सांगतात. मग कोट्यवधींची खरेदी केलेली औषधे जातात कुठे, असा सवाल करून शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आरोग्य विभागावर जोरदार हल्ला चढवला. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना मोटारी नुसत्या फिरायला नाही, तर रुग्णालयांना भेटी देण्यासाठी आणि तेथील अडचणी सोडवण्यासाठी दिल्या आहेत, असा टोला त्यांनी शुक्रवारी (ता. 22) स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना लगावला. 

महापालिका रुग्णालयांना औषधे पुरवण्याच्या कंत्राटाचा 34 लाख 32 हजार 272 रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीच्या बैठकीत आला होता. त्यावर चर्चा करताना नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. रुग्णांना मोफत औषधे मिळावीत यासाठी महापालिका कोट्यवधींची औषधे खरेदी करते. मग त्यानंतरही रुग्णांना बाहेरून औषधे का आणावी लागतात, असा प्रश्‍न शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत पाटील यांनी विचारला. वेळेवर औषधे न मिळाल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केला. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना हातात किंवा पायात स्टीलचे रॉड टाकायचे झाल्यास तेही त्यांना बाहेरून आणायला सांगितले जाते. तेव्हा ते रुग्णालयात मिळाले पाहिजेत, अशी सूचना कॉंग्रेसच्या मीरा पाटील यांनी केली. आपण एकदा अचानक रुग्णालयाला भेट दिली, तेव्हा मधुमेहाच्या रुग्णाला बाहेरून गोळ्या आणण्यास सांगितल्याचे निदर्शनास आले, असे सभापती शुभांगी पाटील यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिकेने मोटारी दिल्या आहेत, त्या केवळ घरातून पालिकेत येण्यासाठीच नाहीत; तर रुग्णालयांना भेटी देऊन तेथील परिस्थिती पाहण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दिल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. 

बेकायदा पार्किंगवर कारवाईची मागणी 
ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर महापालिकेने बांधलेल्या सर्व्हिस रोडवर एमआयडीसीतील कंपन्यांची वाहने उभी केली जातात. त्यांच्यावर महापालिका कारवाई का करत नाही, असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे देवीदास हांडे-पाटील यांनी विचारला. अन्य ठिकाणी बेकायदा पार्किंगवर जशी कारवाई केली जाते, तशी येथील वाहनांवरही करा, अशी मागणी शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांनी केली. रस्त्यात मधोमध उभ्या केल्या जाणाऱ्या या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. यावर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी सूचना सभापती शुभांगी पाटील यांनी केली. तेव्हा यासाठी महापालिका टोईंग व्हॅन खरेदी करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांनी सांगितले. 

तीन कोटींचे प्रस्ताव मंजूर 
रुग्णालयांना औषधे पुरवण्याचा 34 लाखांचा आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील विटावा ते रबाळे पोलिस ठाणेदरम्यानच्या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा 72 लाख 46 हजार 114 रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला होता. तुर्भे झोन क्रमांक 4 येथील मलनिःसारण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एक कोटी दोन लाख 70 हजारांच्या कामाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याबाबतचाही प्रस्ताव पटलावर आला होता. सुमारे तीन कोटींच्या या प्रस्तावांपैकी दोन प्रस्तावांवर चर्चा झाल्यानंतर मलनिःसारणचा प्रस्ताव चर्चेविना मंजूर झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com