विकासाच्या दिशेने तळोजाची घोडदौड

सुजित गायकवाड
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या मार्गाचा मान तळोजा वसाहतीला मिळाला आहे. भविष्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचा मार्गही तळोजा-खांदेश्‍वर असा असणार आहे. वसई-विरार फ्रेट कॉरिडोर मार्गही तळोजातून जाणारा असल्याने भविष्यात मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे, गोवा आदी कोणत्याही ठिकाणी इथून जाणे शक्‍य होणार आहे

नवी मुंबई - देशातील सर्वांत मोठ्या औद्योगिक वसाहतीनंतर आता जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे पनवेलजवळील तळोजा नोड रहिवासी संकुल म्हणून विकसित होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांमुळे त्याच दर्जाच्या सुविधांनी युक्त असे रहिवासी संकुल तळोजात तयार होत आहे. अल्पावधीतच तळोजा नोडमध्ये उंच उंच निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या मार्गाचा मानही तळोजा वसाहतीला मिळाला असल्याने राहण्यासाठी हळूहळू ते हॉट डेस्टिनेशन होत आहे.

हाजी मलंग डोंगररांगांमधून उगम पावलेली कासाडी नदी तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहते. कासाडी नदीमुळे तळोजा वसाहतीचे दोन भाग झाले आहेत. एकाला तळोजा फेज-1 व दुसरा तळोजा फेज-2 म्हणून ओळखला जातो. फेज-1 मध्ये तळोजा रॅपिड ऍक्‍शन फोर्स रहिवासी संकुल ते पापडीचा पाडा असा 2 ते 14 सेक्‍टर परिसर येतो. पेईंधर गाव ते सेक्‍टर 25 असा विस्तृत परिसर तळोजा फेज-2 मध्ये मोडतो. पेईंधर गावाच्या परिसरात कमीत कमी चार हजार 200 ते जास्तीत जास्त सहा हजार चौरस फूट दर सुरू आहे. ग्राहकांसाठी चार मजल्यांपासून 25 मजली टॉवरमध्ये घरे उपलब्ध आहेत. तिथे 30 ते 40 लाखांत ग्राहकांना 600 ते 750 चौरस फुटांपर्यंतचे वन बीएचके घर सहज उपलब्ध आहे. 980 ते 1200 चौरस फुटांच्या टू बीएचकेसाठी 45 ते 85 लाख मोजावे लागतात. अद्ययावत जिम, चांगल्या दर्जाचे गार्डन, लहान पोडियम व इनडोअर गेमची सुविधा असलेले क्‍लब हाऊसही ग्राहकांना देण्यात विकसक आघाडीवर आहेत.

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांश वर्ग अल्प उत्पन्न गटातील असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्यांसोबत लहान आकाराची घरे तयार करण्यावर भर दिला आहे. 390 ते 450 चौरस फुटांचे वन रूम किचनही उपलब्ध आहेत. 21 ते 27 लाख त्यासाठी मोजावे लागतात. तळोजात उभ्या राहणाऱ्या बहुतांश इमारती भूकंपरोधी तंत्रज्ञानावर तयार करण्यात आल्या आहेत.

खारघर ते बेलापूरपासून तळोजाकरिता एनएमएमटी बस सेवा आहे. सिडकोच्या माध्यमातून तयार झालेला पूर्ण नियोजित नोड आहे. तळोजामध्ये देवरत्न, पांचनंद हाईट, लाभेश्‍वर, कामधेनू ऑरा, मंगलम, प्रिझम हाईटस्‌, अष्टविनायक हाईटस्‌, अरिहंत अमोदिनी, गामी, अमर हार्मोनी आदी मोठमोठे टॉवर आहेत. आंध्र बॅंक, स्टेट बॅंक आदींबरोबरच काही नॅशनलाइज्ड बॅंकाही आल्या आहेत.

विस्तृत रस्ते आणि उड्डाणपूल
विस्तृत रस्ते हे तळोजा नोडचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. तळोजा फेज-2 मध्ये कमीत कमी 15 मीटरचे लहान रस्ते आहेत. 60 मीटरचे मोठे रस्ते आहेत. फेज-1 व फेज-2 ला जोडणारा पापडीचा पाडा ते पेईंधर उड्डाणपूल सिडकोने बांधला आहे. त्यामुळे दोन्ही फेज एकमेकांना जोडले गेले आहेत. खारघर-ओवे गावपासून फेज-2 पेईंधरला जोडणारा उड्डाणपूल सध्या सिडकोच्या माध्यमातून तयार होत आहे. त्या नोडमुळे तळोजातून काही मिनिटांत खारघरमध्ये येणे शक्‍य होणार आहे.

मेट्रोचा डेपो
तळोजामधील पेईंधर गावाजवळ सिडकोच्या मेट्रोचा डेपो आहे. सध्या त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो तळोजातील पेईंधर गावातून सुरू होणार आहे. नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या मार्गाचा मान तळोजा वसाहतीला मिळाला आहे. भविष्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचा मार्गही तळोजा-खांदेश्‍वर असा असणार आहे. वसई-विरार फ्रेट कॉरिडोर मार्गही तळोजातून जाणारा असल्याने भविष्यात मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे, गोवा आदी कोणत्याही ठिकाणी इथून जाणे शक्‍य होणार आहे.

तळोजात सिडकोचाही प्रकल्प
उलवे नोड व खारघरनंतर आता सिडकोचा तळोजा नोडमध्येही रहिवासी प्रकल्प सुरू होत आहे. अल्प उत्पन्न गटातील सदनिका तयार करण्याचे काम तळोजात सुरू आहे. सध्या 14 मजली 113 टॉवरचे काम सुरू झाले आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर तळोजातील दर 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे.

तळोजा वसाहत राहण्यायोग्य असून काही इमारती तयार झाल्या आहेत. खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तत्काळ तिथे राहता येईल. तळोजा नोड विकसित होत असल्यामुळे सर्वांच्या आवाक्‍यातील घरे तिथे आहेत.
- अनिल पटेल (भागीदार, प्रिझम एंटरप्रायझेस)

तळोजा वसाहत राहण्याबरोबरच गुंतवणुकीसाठीही उत्तम आहे. घरातली गुंतवणूक काही वर्षांनी तिप्पट झालेली असेल. परिणामी चांगले रिटर्न्स मिळतील.
- बिपीन पटेल (भागीदार, त्रिकोण डेव्हलपर्स)

तळोजा वसाहतीला सिडकोतर्फे 24 तास पाणीपुरवठा केला जातो. सर्व प्रकारच्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. तळोजा वसाहत राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
- गणेश पटेल (भागीदार, देव कृपा बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स)

Web Title: mumbai news: metro taloja