बीडीडी चाळींच्या निविदेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने मागवलेल्या निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद लाभला. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पाच वेळा राबवण्यात येते; मात्र बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी केवळ दोन कंपन्या आल्यानंतरही त्याची मुदत वाढवली नाही. टेंडर भरलेल्या दोन कंपन्यांना एका एका ठिकाणचे काम देण्यात आले. या प्रक्रियेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांच्या एकत्रित संघाने केला आहे.

प्रेस क्‍लबमध्ये मंगळवारी (ता. १८) झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी हा आरोप केला. बीडीडी चाळींमध्ये सुमारे ९७ टक्के मराठी कुटुंबे राहत आहेत. मुंबईच्या जडणघडणीमध्ये मराठी माणसांनी मोठे योगदान दिले आहे; मात्र या मुंबईकरांना पुनर्विकासाच्या नावावर मुंबईबाहेर काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या पक्षांनी बीडीडी चाळींमधील मराठी माणून मुंबईबाहेर फेकला जाणार नाही यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

बीडीडी चाळींतील रहिवाशांसोबत करार करण्यात येत नाही, त्यामुळे आता घर सोडल्यास पुन्हा त्याच जागेवर घर मिळेल की नाही याची हमी नाही. त्यामुळे आम्ही करारासाठी आग्रही अाहे, असे डॉ. वाघमारे म्हणाले. आमदार कालिदास कोळंबकर आणि आमदार सुनील शिंदे हे वेगवेगळ्या घोषणा करून आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. रहिवाशांना धमकावून बायोमेट्रिक सर्व्हेचे काम करण्यात येत असून नायगावमध्ये एकाही घराचे बायोमेट्रिक सर्वेक्षण झाले नसल्याचे वाघमारे म्हणाले.

सरकार आणि म्हाडामार्फत पात्रतेसाठी बायोमेट्रिक करण्याचा घाट घालत आहेत; मात्र आम्ही अनेक पिढ्या येथे राहत असून आमच्या बायोमेट्रिकची गरजच काय, असा सवाल वाघमारे यांनी केला. रहिवाशांचा संयम सुटत चालला आहे. उद्या रहिवासी रस्त्यावर उतरून काही अनुचित घडल्यास त्याला म्हाडा आणि सरकार जबाबदार राहील. तसेच आंदोलनात सहभागी झाल्याने मला धमक्‍या येत असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.

कोळंबकर यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे
वडाळा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे म्हाडा आणि सरकारला पुनर्विकासासाठी सहकार्य करत आहेत. रहिवाशांचा तीव्र विरोध असतानाही ते बायोमेट्रिक सर्व्हेचे समर्थन करत आहेत. त्यांच्या भूमिकेविषयी मी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली अाहे, असे डॉ. राजू वाघमारे यांनी सांगितले.