धारावीत म्हाडाच्या आणखी दोन इमारती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्‍टर 1 ते 4 चे काम रखडलेले असतानाच म्हाडाने सेक्‍टर 5 चे काम वेगाने हाती घेतले आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने म्हाडाला आणखी दोन इमारती उभारण्यास परवानगी दिल्याने त्यांचे बांधकाम काही दिवसांत सुरू होईल. येथील पीएमजीपी कॉलनीतील पाच इमारतींतील रहिवाशांना 405 चौरस फुटाचे घर देण्यात येईल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्‍टर पाचचे काम सरकारने म्हाडाकडे सोपवले आहे; तर सेक्‍टर 1 ते 4 चे काम धारावी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. चार सेक्‍टरसाठी निविदा प्रक्रिया राबवल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने येथील झोपड्या, चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. चार सेक्‍टरचा पुनर्विकास रखडलेला असतानाच म्हाडाने सेक्‍टर पाचच्या पुनर्विकासाला वेगाने सुरुवात केली आहे. प्रकल्पाची पथदर्शी इमारत उभारून त्यातील घरांचा रहिवाशांना ताबाही देण्यात आला आहे. या प्रकल्पातील क्रमांक 4 आणि 5 च्या इमारतीच्या कामाला म्हाडाने सुरुवात केली आहे. हे काम प्रगतिपथावर असतानाच धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने म्हाडाला आणखी दोन इमारती उभारण्यास परवानगी दिली आहे. 

म्हाडा काही दिवसांत क्रमांक 2 आणि 3 च्या इमारतीचे काम हाती घेणार आहे. या इमारतींत सेक्‍टर 5 मधील पीएमजीपी कॉलनीतील चार ते पाच इमारतींमधील रहिवाशांना 405 चौरस फुटांचे घर देण्यात येणार आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.