बाजारभावापेक्षा म्हाडाची घरे महाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

पवईतील घरांची किंमत एक कोटी 61 लाख

मुंबई: परवडणाऱ्या घरांची उभारणी करून सामान्यांना हक्काचा निवारा देणाऱ्या म्हाडाने घरांच्या किमतीच कोट्यवधींवर नेऊन ठेवल्या आहेत. काही दिवसांत जाहीर होणाऱ्या सोडतीत समावेश करण्यात आलेल्या पवई तुंगातील "टू बीएचके' घरांची किंमत तब्बल एक कोटी 61 लाख आहे.

पवई तुंगामध्ये सध्या 20 ते 21 हजार रुपये प्रतिचौरस फूट बाजारभावाने घरांची विक्री होत असताना म्हाडा सुमारे 21 हजार 300 प्रतिचौरस फूट दराने घरांची विक्री करत असल्याने ही घरे महागडी ठरली आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत पुढील आठवड्यात घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे 784 घरांचा समावेश असून सर्वाधिक घरे कांदिवली चारकोप येथील आहेत; तर पवई तुंगा येथील उच्च उत्पन्न गटातील 168 घरांचा समावेश आहे. या घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील अशा ठेवणे अपेक्षित असताना म्हाडाने या घरांची किंमत बाजारभावापेक्षा अधिक दराने वसूल करण्याचे ठरवले आहे. 750 चौरस फुटांच्या घरासाठी उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना तब्बल एक कोटी 61 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

म्हाडा बांधकाम खर्चानुसार घराची किंमत ठरवते. प्रशासकीय खर्च आणि सोडतीचा खर्च यासाठी म्हाडा उच्च उत्पन्न गटातील घरांच्या रकमेवर 10 टक्के नफा वसूल करते. कार्पेट एरियानुसार म्हाडा येथील घरांची विक्री करत असतानाही या घरांची किंमत बाजारभावापेक्षा अधिक होत असल्याचे, म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कबूल केले.

अनेक वर्षांपूर्वी जमीनीचा ताबा
म्हाडाने खासगी विकसकाच्या तुलनेत कमी रकमेत घरांची विक्री करणे अपेक्षित आहे. म्हाडाला अनेक वर्षांपूर्वी जमीन मिळाली आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांची किंमत बाजारभावापेक्षा कमी असणे अपेक्षित होते, असे बिल्डर असोसिएशनचे माजी प्रवक्ता आनंद गुप्ता यांनी सांगितले.