म्हाडाच्या प्रयोगशाळेला भ्रष्टाचाराची वाळवी

तेजस वाघमारे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे समोर येत असतानाच म्हाडाच्या आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेल्या साहित्य चाचणी प्रयोगशाळेलाही भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बांधकाम साहित्याची तपासणी न करताच काही अधिकारी चिरीमिरी घेऊन कंत्राटदारांना प्रमाणपत्र देत आल्याचा व्हिडिओ "सकाळ'च्या हाती आला आहे.

मुंबई - भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे समोर येत असतानाच म्हाडाच्या आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेल्या साहित्य चाचणी प्रयोगशाळेलाही भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बांधकाम साहित्याची तपासणी न करताच काही अधिकारी चिरीमिरी घेऊन कंत्राटदारांना प्रमाणपत्र देत आल्याचा व्हिडिओ "सकाळ'च्या हाती आला आहे.

"म्हाडा'अंतर्गत असलेल्या विविध मंडळांच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याचा दर्जा तपासणीसाठी ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. तेथे सिमेंट, स्टील, वाळू, विटा, खडी, विविध प्रकारच्या टाईल्स आदी साहित्यांची भारतीय मानक संस्थेच्या निकषांप्रमाणे चाचण्या करणे अपेक्षित आहे. या चाचण्या कार्यकारी अभियंत्यांच्या (दक्षता व गुण नियंत्रण) मार्गदर्शनाखाली उपअभियंता व शाखा अभियंता यांच्यामार्फत होतात; मात्र या प्रयोगशाळेतून 2012मध्ये देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले आहेत.

प्रयोगशाळेत येणाऱ्या बांधकाम साहित्यांची कार्यालयात नोंद होत नसल्याने बोगस आणि सत्य प्रमाणपत्रे कोणती हे समजत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चाचणी करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जागेवर जाऊन बांधकामामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पाहणी करणे आवश्‍यक असते; मात्र हे अधिकारी काम सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी करत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

दुप्पट रक्कम आकारून प्रमाणपत्र
कंत्राटदारांकडून बांधकाम साहित्यांचे नमुने तपासणीसाठी न घेताच चाचणीसाठी दुप्पट रक्कम आकारून प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे या व्हिडिओमुळे उघड झाले आहे. संबंधित अधिकारी बांधकाम साहित्य तपासणीच्या शुल्कासह अतिरिक्त शुल्क आणि मंजुरीसाठी अधिक रक्कम घेत असल्याचे त्यात दिसत आहे. एका कंत्राटदाराने या प्रयोगशाळेतच हा व्हिडिओ काढला आहे. बोगस प्रमाणपत्रामुळे चाचणीचा अहवाल माहीत होत नाही. त्यामुळे कामांचा दर्जाही कोणाला समजत नाही. कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांचे प्रयोगशाळेतील कामांवर लक्ष नसल्याने बोगस प्रमाणपत्रे देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.