एमआयडीसीच्या सुरक्षेला धोका

एमआयडीसीच्या सुरक्षेला धोका

तुर्भे - आशिया खंडातील सर्वांत मोठ्या औद्यागिक वसाहतींपैकी एक म्हणून ठाणे-बेलापूर मार्गावरील औद्यागिक वसाहत ओळखली जाते. येथे पार्किंगसाठी आरक्षित जागा नाही. येथील रस्तेच बेकायदा पार्किंगचे केंद्र बनले आहेत. येथील अनेक कंपन्या व कारखाने बंद पडलेले आहेत. अशा या कंपन्यांमध्ये चोरीच्या आणि आगीच्या घटना घडत असतात. असे असताना आता बंद पडलेले कारखाने व कंपन्यांसमोर मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग होत आहे. त्यात घातक आणि ज्वलनशील रसायनांच्या टॅंकरचाही समावेश असल्याने मोठ्या दुर्घटनेची येथे शक्‍यता आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि पर्यायाने येथील कंपन्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. 

एमआयडीसीत वाहनतळ नसल्याने वाहने कुठेही उभी केली जातात. परिणामी, एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आयटी पार्क, हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्‌समध्ये वाहनतळांच्या जागांवर बेकायदा उद्योग सुरू आहेत. यामुळे येथील रस्त्यांच्या दुतर्फा नेहमी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. 

एमआयडीसी व्यवस्थापनही याकडे दुर्लक्ष करत आहे. दिघा ते नेरूळपर्यंतच्या औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर ज्वलनशील रसायनांनी भरलेले टॅंकर उभे असतात. काही ठिकाणी तर हे टॅंकर आठ-१० दिवस एकाच जाग्यावर उभे असतात. एमआयडीसीत वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास नवी मुंबईचा भोपाळ होण्याची भीती आहे.

एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये परराज्यातून रसायन घेऊन टॅंकर येतात. या कंपन्यांकडे वाहनतळ नसल्याने ते रस्त्यावरच उभे असतात. त्यांचे चालक आणि क्‍लिनरही तेथेच मुक्कामाला असतात. जेवण बनवणे; तसेच आंघोळ ते रस्त्यावरच करतात. यामुळे वसाहतीला आगीचा आणि स्फोटाचा धोका आहे. एमआयडीसीतील काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले असले, तरी काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच येथे दुतर्फा बेकायदा पार्किंग होते. खैरणे एमआयडीसीमध्येही वाहनांची गर्दी असते. विशेष म्हणजे, दिघा ते नेरूळ या औद्योगिक पट्ट्यात एकही सिग्नल आणि ‘नो पार्किंग’चा फलक नाही. पावणे एमआयडीसीमध्ये गॅलेक्‍सी कंपनीजवळ अशीच वाहनांची रांग असते.

कोंडीची ठिकाणे 
दिघा ते नेरूळ एमआयडीसी
उरण फाटा सर्व्हिस रोड
शिरवणे एमआयडीसी 
तुर्भे एचपीसीएल 
इंदिरानगर बगाडे कंपनी 
पावणे, महापे एमआयडीसी 

बंद पडलेल्या वाहनांची भर
एमआयडीसीत अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर अवजड, बंद पडलेली आणि भंगार वाहने उभी असतात. बोनसारी गावाकडून जाणाऱ्या रस्त्यावरही अशीच अवजड वाहने उभी असतात. एचपीसीएल कंपनीसमोर तर शेकडो टॅंकर बाराही महिने दुतर्फा उभी असतात. त्यातून मार्ग काढणे इतर वाहनचालकांना अवघड जाते. शिरवणे एमआयडीसीतही अवजड वाहनांची गर्दी असते. नेरूळ ते उरण फाटा दरम्यानच्या शो रूममधील वाहने सर्व्हिस रोडवर उभी असल्याने येथे वाहनचालकांची गैरसोय होते. 

पाच लाख वाहनांची वर्दळ
नवी मुंबईची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयात २००४ पासून सुमारे चार लाख वाहनांची नोंद झाली आहे. १४ लाख लोकसंख्येच्या शहरात किमान पाच लाखांपेक्षा अधिक वाहनांची रोज वर्दळ असते. पालिका, एमआयडीसी व सिडको प्रशासनाने योग्य नियोजन न केल्याने शहरात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. एमआयडीसीत एकही वाहनतळ किंवा ट्रक टर्मिनल नाही. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग होते.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केला आहे. स्वतःचे ट्रक टर्मिनल सुरू करावे, असे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत सांगितले होते. एमआयडीसीने दोन भूखंड वाहनतळासाठी आरक्षित ठेवले आहेत; पण त्यांचा विकास कुणी करायचा हे अद्याप ठरले नाही.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

शहरात पार्किंगसाठी वाहनतळ नाहीत, वाहतूक विभागाकडून बेकायदा पार्किंगवर नियमित कारवाई सुरू असते. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. 
- नितीन पवार, उपायुक्त (वाहतूक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com