फेरीवाल्यांवरून काँग्रेस, मनसे कार्यकर्ते भिडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

या सर्व प्रकारानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. माझ्या घराजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड का? कोणत्या नियमाने त्यांना ताब्यात घेतले जात आहे? जमावबंदी लागू केली आहे का? 

मुंबई : दादर येथे आज (बुधवार) फेरीवाल्यांवरून मनसे आणि कॉंग्रेसमधील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या घरासमोर भाज्या आणि फळांच्या गाड्या लावल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराजवळ काँग्रेसने आज मराठी फेरीवाल्यांसाठी 'सन्मान मोर्चा' काढण्याचे ठरविले होते. या मोर्चाला विरोध म्हणून मनसेचे कार्यकर्तेही दादर येथे जमा झाले होते. यावेळी होणार संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर बटाटे फेकल्याची घटना घडली. 

या सर्व प्रकारानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. माझ्या घराजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड का? कोणत्या नियमाने त्यांना ताब्यात घेतले जात आहे? जमावबंदी लागू केली आहे का? 

शनिवारी मालाड येथे झालेल्या हाणामारीनंतर मनसेने फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी निरुपम यांच्या अंधेरी येथील घरासमोर भाज्या व फळांच्या गाड्या उभ्या करून जोरदार निदर्शने केली. मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दादर येथील फेरीवाल्यांसाठी काँग्रेसने आज मूक मोर्चाचे आयोजन केले होते. दादरमधील रानडे मार्गावर बहुसंख्य मराठी फेरीवाले सात-आठ दशकांपासून व्यवसाय करत आहेत. मनसेचे कार्यकर्ते त्यांना मारहाण करत असल्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे निरुपम यांनी सांगितले होते. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनसेने काही दिवसांपूर्वी दादरमध्ये "मूक मोर्चा' काढला होता.