भाजपचा 'मोदी मोदी' गजर; शिवसेना म्हणते चोर...चोर...!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 जुलै 2017

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी... मोदी चा जयघोष सुरू केला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनही चोर... चोर असा नारा देण्यात आला.

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात घट होणार असल्याने राज्य सरकारच्या वतीने मोबदला देण्याचा धनादेश देण्याचा कार्यक्रम होता. सुमारे 700 कोटी रुपयांचा धनादेश अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापौरांना सुपुर्द केला. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी "मोदी... मोदी'च्या गजराला शिवसेनेकडून "चोर... चोर...' म्हणत उत्तर दिले.

जीएसटीच्या अनुदानाचा धनादेश सुपुर्द करण्याच्या सोहळ्यात शिवसेना भाजपची जोरदार घोषणाबाजी झाली. यादरम्यान पुन्हा गोंधळ सुरू झाला. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी 647 कोटी 34 लाखाचा धनादेश मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे दिला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी... मोदी चा जयघोष सुरू केला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनही चोर... चोर असा नारा देण्यात आला. काहीवेळ दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांसह कार्यकर्ते' एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. 

भाजप नगरसेवक नार्वेकरांना चोप 
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या प्रवेश द्वारातून येत असताना शिवसैनिक आणि मकरंद नार्वेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. घोषणाबाजीही झाली. त्यावेळी नार्वेकरांना शिवसैनिकांनी घेराव घातला आणि धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत नार्वेकरांचा शर्ट शिवसैनिकांनी फाडला तसेच त्यांना मारहाणही केली. या कार्यक्रमात मोदींच्या घरातही संप सुरू असल्याचा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी करताच संपुर्ण कार्यक्रमावर भाजपच्या नगरसेवकांनी बहिष्कार घातला.