मुंबई पोलिसांच्या व्हॅनमध्ये नोटपॅड!

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - शहरात कुठेही अनुचित घटना घडली, तर त्याची सचित्र माहिती वरिष्ठांना मिळावी म्हणून पोलिसांच्या गस्ती व्हॅनमध्ये नोटपॅड बसवून त्याच्या साह्याने घटनास्थळाचे फोटो नियंत्रण कक्षाला पाठविण्याचा प्रयोग सध्या सुरू आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई पोलिस आता हायटेक होत आहेत. ‘मोबाईल डेटा टर्मिनल’ नावाचा उपक्रम मुंबई पोलिस सुरू करत आहेत. पोलिसांच्या गस्ती वाहनांमध्ये नोटपॅड बसवले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर असा उपक्रम दक्षिण प्रादेशिक विभागात सुरू करण्यात आला आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहविभागाने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर दिला. पोलिसांसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहनांची खरेदी केली. शहर सुरक्षित राहण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे जाळे पसरवले. सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिस शहरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी ‘इमर्जन्सी रिस्पॉन्ड मोबाईल सर्व्हिलन्स कंट्रोल कमांड सेंटर’ सुरू केले. काही अनुचित घटना घडल्यावर कमांड सेंटरचे वाहन घटनास्थळी जाते. त्यानंतर तेथील माहिती काही वेळातच पोलिस नियंत्रण कक्षाला मिळते. त्यावर न थांबता भविष्यातील सुरक्षेचा विचार करून पोलिसांच्या गस्ती वाहनामध्ये ‘मोबाईल डाटा टर्मिनल’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून डाटा टर्मिनल जोडण्यात येईल. हा सीसी टीव्ही प्रकल्पाचाच एक भाग आहे. प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण प्रादेशिक विभागातल्या काही पोलिस ठाण्यांतील वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येत आहे. डाटा टर्मिनलच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईतील पोलिसांच्या गस्ती वाहनांमध्ये टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

काय आहे मोबाईल डाटा टर्मिनल
मोबाईल डाटा टर्मिनलच्या माध्यमातून पोलिस वाहनामध्ये नोटपॅड बसवण्यात आले आहे. त्या नोटपॅडमधून घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते काही क्षणात पोलिस नियंत्रण कक्षाला पाठवता येतील. त्यामुळे घटनास्थळाची अचूक माहिती मिळेल. तसेच काही घटनांमध्ये प्राथमिक तपासासाठी महत्त्वपूर्ण फोटो नियंत्रण कक्षातून डाटा टर्मिनलला पाठवता येतील. टॅबच्या माध्यमातून फोनवर माहितीची देवाणघेवाण करता येईल.