पावसामुळे सोलापूर-मुंबई सुपरफास्ट एक्‍स्प्रेस रद्द, 7 गाड्या उशिरा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

सर्व प्रवाशांनी वरील गाड्यांच्या वेळेतील बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

सोलापूर : मुंबई येथे मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर विभागावरून धावणारी दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर एक गाडी अंशतः रद्द केली व 6 गाड्या आपल्या वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत. 
गाडी क्रमांक 22140, 22139 सोलापूर-मुंबई सुपरफास्ट एक्‍स्प्रेस ही मंगळवारी सोलापूर तसेच मुंबई येथून रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक 51030 विजापूर-मुंबई फास्ट पॅसेंजर ही केवळ विजापूर ते दौंड स्थानकापर्यंत धावेल. दौंड ते मुंबईदरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली. 

मुंबईहून सुटणारी गाडी क्रमांक 11027 सहा तास 15 मिनिटांनी उशिरा धावेल, तर गाडी क्रमांक 16351 मुंबई-नागरकोईल,17031 मुंबई-हैदराबाद, 11041 मुंबई-चेन्नई, 11019 मुंबई-भुवनेश्‍वर, 16381 मुंबई-कन्याकुमारी या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. सर्व प्रवाशांनी वरील गाड्यांच्या वेळेतील बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

एसटीवर परिणाम नाही 
सोलापूर आगारातून एसटीची एकमेव गाडी आहे. ती सकाळी साडेआठ वाजता रवाना झाली आहे. येणारी गाडीही मुंबई येथून निघाली आहे. त्यामुळे मुंबईच्या पावसाचा एसटीवर परिणाम झालेला नाही. मात्र उद्या परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती, स्थानकप्रमुख सदाशिव कदम यांनी दिली.