मुंबई विद्यापीठाचे "तारीख पे तारीख'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठात दररोज विद्यार्थी संघटनांची आंदोलने होत आहेत. दररोज कुलगुरूंच्या भेटीनंतर नवनव्या डेडलाइन देण्याचा प्रकार सुरू आहे. आता वाणिज्य शाखेचा निकाल 16 ऑगस्टला लागेल, अशी नवी घोषणा कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केली आहे.

बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि कॉंग्रेसच्या वतीने मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी कलिना संकुलात एकच राळ उडवून दिली. दोन्ही संघटनांनी कुलगुरूंची भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने खोळंबलेल्या निकालांबाबत विचारताच कायदा व वाणिज्य शाखेच्या बऱ्याच उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत, असे कुलगुरूंनी सांगितले. वाणिज्य शाखेचा निकाल 16 ऑगस्टपर्यंत, तर कायदा विषयाचा निकाल 12 ऑगस्टपर्यंत लागेल, असेही ते म्हणाले.

परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक दीपक वसावे यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी मनविसेने या वेळी केली. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा सर्व महाविद्यालयांत 20 टक्‍क्‍यांनी वाढवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली. निरूपम यांच्या भेटीतही कुलगुरूंनी 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागणे अशक्‍य असल्याचे मान्य केले. त्यामुळे कुलगुरूंसह शिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी निरूपम यांनी केली.